Wed, Jun 26, 2019 17:33होमपेज › Belgaon › शुल्क आम्ही भरतो, डीएड् तुम्ही करा!

शुल्क आम्ही भरतो, डीएड् तुम्ही करा!

Published On: Aug 29 2018 1:41AM | Last Updated: Aug 28 2018 10:20PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्यातील डीएड महाविद्यालयांची परिस्थिती बिकट झाली आहे. मराठी, कन्नड व ऊर्दू माध्यम डीएड महाविद्यालयांना उतरती कळा आहे. एकेकाळी प्रवेश द्या, म्हणून रांगा लागल्या होत्या. आता शुल्क आम्ही भरतो, डीएड तुम्ही करा, अशी वेळ प्राध्यापकांवर आली आहे.  याला जबाबदार सरकारच आहे. राज्यात सरकारी, अनुदानित शाळांतून शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत. मात्र त्या भरण्यात आल्या नाहीत. सहा वर्षापासून भरती रखडली आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी डीएडकडे पाठ फिरविली.

सरकारने डीएड महाविद्यालये सुरू करण्यासाठी दिलेला परवाना घातक ठरला आहे. जिल्ह्यात  84 महाविद्यालये होती. यामधील बेळगावमध्ये 5 व चिकोडीत 8 महाविद्यालये सुरू आहेत. तेथेही विद्यार्थी प्रवेश कमी  आहे.   

शिक्षण खात्याने शिक्षण भरतीत अनेक बदल केले आहेत. पहिली ते पाचवी वर्गासाठी डीएड धारकांनी संधी दिली. सहावी ते आठवी वर्गासाठी बीएड पदवीधारकांची नियुक्ती करत आहे. मात्र भरती करताना टीईटी उत्तीर्ण होऊन सीईटीतील गुणाच्या आधारे शिक्षक म्हणून निवड केली जात आहे. मात्र एकदा सीईटी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याच विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देणे गरजेचे आहे. शिक्षण खाते विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कच्या नावाने लाखो रुपये गोळा करत आहे. 

यापूर्वी डीएड विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. पण परीक्षा रद्द झाली. विद्यार्थ्यांचे शुल्क खात्यावर जमा करणार असे सांगितले होते. मात्र रक्कम खात्यावर जमा केलीच नाही. सरकार परीक्षेच्या नावाने विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल करीत आहे. 

राज्य सरकारने दहा हजार जागा भरणार असे घोषित केले. पण सीईटी उत्तीर्ण न झाल्याने जागा रिक्त दाखविल्या आहेत. परीक्षेच्या नियमावलीत बदल केल्याने अनेक विद्यार्थी सीईटीत पास झाले नाहीत. यामुळे शिक्षक म्हणून नियुक्ती झाली नाही. परिणामी डीएड व बीएड पदवी घेऊन मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेकार आहेत. 

इंग्रजी शिक्षणाचे फॅड

शहर, उपनगर व ग्रामीण भागातही  इंग्रजी शाळांतून पालक पाल्यांना पाठवत आहेत. यामुळे  मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व कमी झाले आहे.  जोपर्यंत सरकार लोकप्रतिनिधी, अधिकारी व सरकारी कर्मचार्‍यांच्या मुलांना सरकारी शाळांची सक्ती आदेश काढत नाही, तोपर्यंत सर्वच माध्यमांतील शाळांना धोका आहे.

एका जागी तीन अतिथी

सरकार एका शिक्षकाच्या जागी तीन अतिथी शिक्षकांची नेमणूक शाळेतून करीत आहे. त्या शिक्षकांकडून अध्यापन करून घेत आहे. तीच परिस्थिती महाविद्यालयातून सुरू आहे. त्यामुळेच शाळांतील भरती रखडत चालली आहे.

शिक्षक भरती रखडल्याने फक्त डीएड व बीएड पदवी घेतलेले घरी आहेत. यापूर्वी महाराष्ट्रात  नोकरीची संधी होती. मात्र टीईटी, सीईटी सुरू केल्याने शिक्षक भरती रखडली. हजारो विद्यार्थी पदवीधर आहेत.  - पी. एन. पाटील,डीएड धारक