होमपेज › Belgaon › ढोणेवाडी प्राथ. शाळेची इमारत धोकादायक

ढोणेवाडी प्राथ. शाळेची इमारत धोकादायक

Published On: Jun 30 2018 1:15AM | Last Updated: Jun 29 2018 8:20PMकारदगा : प्रशांत कांबळे

ढोणेवाडी येथील प्राथमिक मराठी शाळेची इमारत जीर्ण झाली असून विद्यार्थ्यांसाठी धोकादायक बनली आहे. शंभर वर्षाची परंपरा लाभलेल्या मराठी प्राथमिक शाळेच्या  खोल्यांचे नूतनीकरण होणे गरजेचे आहे. पावसाळ्यात सर्व वर्गांमध्ये गळती लागली असून त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.सन 1890 मध्ये स्थापन झालेली ढोणेवाडी सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा ही एक मराठी भाषा टिकवून ठेवण्यात आदर्शवत भूमिका पार पाडत आहे. मराठी शाळांचे अस्तित्त्व शासनाच्या दुर्लक्षामुळे धोक्यात आले आहे. ढोणेवाडी प्राथमिक शाळेत अनेक गुणवंत विद्यार्थी घडले आहेत.

खासगीकरणाच्या प्रवाहात सरकारी शाळेची पटसंख्या पहिली ते सातवीपर्यंत 350 आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सात खोल्या असून नऊ शिक्षक अध्यापनाचे काम करत आहेत. अध्ययनाचे धडे घेणार्‍या  विद्यार्थ्यांना बसण्यासाठी असलेल्या खोल्या जीर्ण झाल्या असून ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. शाळेचे छप्परही अनेक ठिकाणी वाकल्याने कधी कोसळेल, ते सांगता येत नाही.शाळेच्या खोल्यांवर असलेली कौले फुटल्याने पावसाळ्यात गळती लागली आहे. खोल्यांचे सिमेंट व वाळू ढिसाळ बनल्याने दगड निखळत आहेत. शाळेला संरक्षण भिंत नसल्याने शाळेभोवती शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या मेहनतीने बाग निर्माण केली आहे. पण मोकाट जनावरे बागेचे सौंदर्य व झाडांचे नुकसान करत आहेत.

शाळेला नागरी सुविधांची वानवा असल्याने विद्यार्थी, पालक व शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागते. शाळेसाठी असलेल्या कूपनलिकेचे पाणी चार-पाच घागरीच मिळत आहे. कन्नड शाळेमध्ये लाखो रुपये खर्चून बसविण्यात आलेले जलशुद्धीकरण केंद्र पाण्याअभावी बंद पडले आहे.संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाला कळवूनदेखील पिण्याच्या पाण्याची सोय अद्याप करण्यात आलेली नाही. मध्यान्ह आहार बनविण्यासाठी महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. संबंधित प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.