Sun, Jun 16, 2019 02:45होमपेज › Belgaon › हवामान बदलाचा जनावरांवर परिणाम

हवामान बदलाचा जनावरांवर परिणाम

Published On: Jul 09 2018 1:01AM | Last Updated: Jul 08 2018 9:38PMबेळगाव : प्रतिनिधी

पावसाळ्याला सुरुवात होऊन महिन्याचा कालावधी उलटला. मागील काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस होत आहे.  यामुळे हवामानात देखील बदल झाला आहे. बदलत्या ऋतूमानाचा ज्याप्रमाणे माणसाच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्याप्रमाणे जनावरांच्या आरोग्यावरही  दिसून येतो. यासाठी पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम जनावरांच्या वागणुकीवर, आरोग्यावर तसेच प्रजननावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या झालेला निदर्शनास येतो. यामुळे पावसाळ्यात पशुपालकांनी जनावरांची काळजी घेणे आवश्यक असते.

पावसाळ्यात म्हशी, बैल, गायी, वासरे, शेळ्या यांच्या आजारांचे प्रमाण वाढते. त्यामुळे त्यांना शक्यतो वेगवेगळ्या जागेवर ठेवावे. त्यासाठी कोरड्या ठिकाणी मुबलक हवा व प्रकाश येईल याची काळजी घ्यावी. खाद्य ओले झाल्यास बुरशीच्या प्रार्दुभावाने विषबाधा होण्याची शक्यता असते. जनावरांच्या आरोग्यासंबंधी नियमित पशुवैद्यकीयांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. गोठ्यातील मलमूत्राचा योग्य निचरा होण्यासाठी गोठा बांधताना योग्य नियोजन आवश्यक असते. यासाठी गोठ्यात  थोडा उतार असणे गरजेचे असते. तसेच मलमूत्राची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. अनेक शेतकरी बाहेर शेड बांधून गोठा बनवितात. मात्र, उघड्यावर गोठा असल्याने ऊन, वारा, पाऊस याचा परिणाम होऊन जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात गोठ्यांमध्ये माशा व डासांचे प्रमाण अधिक होेते. यामुळे जनावरांना वेगवेगळे आजार होतात. त्यामुळे पावसाळ्यात पशुवैद्यांकडून लसीकरण करून घ्यावे. 

अशी घ्या काळजी 

जनावरांचा गोठा नियमित स्वच्छ ठेवा

गोठ्याच्या आजूबाजूला गवत किंवा झाडेझुडुपे वाढू देऊ नका.

छतामधून पाणी येणार नाही, याची दक्षता घ्या.

गोठा व आजूबाजूची जागा निर्जंतुकीकरण करा

जनावरांचे खाद्य पावसाने ओले होणार नाही, याची दक्षता घ्या

पावसाळ्यातदेखील हिरव्या चार्‍याबरोबर सुका चारा द्यावा.

पशुवैद्यांकडून जनावरांना लसीकरण करून घ्यावे.

शेतकर्‍यांनो हे टाळा

शेतकरी पावसाळ्यात जनावरांना जास्त प्रमाणात हिरवा चारा देतात. दिवसभर त्यांना सुका चारा दिला जात नाही. हिरवा चारा जास्त खाणे व दूषित पाण्यामुळे पचनसंस्थेचे आजार होतात. पावसाळ्यात गोठ्यातील अस्वस्छता व दुर्गंधीमुळे जनावरे विविध रोगांना बळी पडू शकतात. तसेच पावसाळ्यात विविध प्रकारचे आजार पसरण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे.