Fri, Apr 26, 2019 01:21होमपेज › Belgaon › ‘म्हादई ’चा ऑगस्टपूर्वी निकाल शक्य

‘म्हादई ’चा ऑगस्टपूर्वी निकाल शक्य

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 22 2018 11:50PMबेळगाव :  प्रतिनिधी   

म्हादई पाणीवाटपासंबंधी निर्माण झालेला तिढा अद्याप सुटलेला नाही. यामुळे उत्तर कर्नाटकातील जनतेत अस्वस्थताच आहे. जे. एम. पांचाल यांच्या नेतृत्वातील म्हादई लवादासमोर नवी दिल्ली येेथे सुरू असलेली अंतिम टप्प्यातील सुनावणी बुधवारी सायंकाळी पूर्ण झाली. निकाल येत्या ऑगस्टपूर्वी लागण्याची शक्यता आहे. गोव्याने आक्षेप घेतल्याने कर्नाटकाच्या बाजूने अ‍ॅड. अशोक देसाई व मोहन कातरकी यांनी बाजू मांडली. हा वाद भावंडांच्या मालमत्ता वाटणीचा नव्हे तर पाणीवाटपाचा आहे. हा वाद निसर्ग, प्राणी, पक्षांना धक्का पोहचणार नाही, अशा पध्दतीने मिटविण्यात आला पाहिजे. म्हादईतील केवळ 200 टीएमसी पाण्याचा वापर गोवा करते. उर्वरित पाणी समुद्राला  जाते. 

कर्नाटकातून वाहणार्‍या म्हादईच्या 45 टीएमसी पाण्यापैकी आम्ही फक्त 14.98 टीएमसीची मागणी करीत आहोत. कोटनीनजीक वीज उत्पादनासाठी 16 टीएमसी पाण्याची मागणी कर्नाटक करीत आहे. वीज उत्पादनाला सुरुवात झाल्यानंतर तेच पाणी पुन्हा गोवा राज्याला मिळेल, असा दावा अ‍ॅड.देसाई यांनी मांडला. कावेरी पाणीप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याचा संदर्भ देऊन अ‍ॅड. देसाई म्हणाले, की कावेरीचे 4.75 टीएमसी पाणी बंगळूरला देण्यात येते. गुजरातमधील नर्मदा योजनेतून राजस्थानला, कृष्णा नदीतून चेन्नईला, यमुनेचे पाणी दिल्लीला देण्यात येेते.

पाण्याची आवश्यकता असणार्‍या भागाला नदीचे पाणी सोडण्यात यावे, असे  सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. म्हादईचे पाणी मलप्रभा नदीकडे वळवून ते हुबळी? धारवाड या जुळ्या शहरांसह अन्य शहरांना पुरविण्यास गोवा सरकार आक्षेप घेत आहे. गोव्याची ही कृती  चुकीची आहे. अंतिम फेरीतील दावा मांडताना प्रख्यात वकील शरद जवळी व एम. बी. जिरली उपस्थित होते.