होमपेज › Belgaon › स्वतंत्र कर्नाटक ध्वजाचा प्रस्ताव आज केंद्रासमोर

स्वतंत्र कर्नाटक ध्वजाचा प्रस्ताव आज केंद्रासमोर

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 13 2018 12:17AMबंगळूर : प्रतिनिधी

कर्नाटक राज्याचा  स्वतंत्र ध्वज असावा, हा राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेला प्रस्ताव आज, मंगळवारी केंद्रीय गृह मंत्रालयासमोर विचारार्थ येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली. दरम्यान, हा विषय न्यायालयासोर न्यावा, अशीही सूचना काही तज्ज्ञांनी केली आहे. 

कर्नाटकने लाल, पांढरा आणि पिवळा असा त्रिवर्णी ध्वज गेल्या आठवड्यात निर्धारित करून तो केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्याची घोषणा केली होती. त्यानुसार हा प्रस्ताव सोमवारी रात्री किंवा मंगळवारी सकाळपर्यंत केंद्र सरकारकडे पोहोचेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मंजुरीसाठी विनंती?

या प्रस्तावात केंद्र शासनाला प्रामुख्याने गृहमंत्रालयाला ध्वजसंहिता 2002 अंतर्गत मंजुरी देण्याची विनंती करण्यात येणार आहे.राज्याला स्वतःचा ध्वज  असावा की नसावा, याबाबत राज्यघटनेत स्पष्ट निर्देश नाहीत. मात्र तिरंगा हाच देशाचा ध्वज असेल, हे स्पष्ट आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या स्वतंत्र ध्वजाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याबाबत सांशकता व्यक्त होत आहे.

गृहमंत्रालयातील अधिकार्‍यांच्या मतानुसार, भारत हा एकच देश असल्याने  एकच राष्ट्रध्वज असला पाहिजे. तर या संदर्भात राज्यघटना काय म्हणते, कर्नाटक राज्यासाठी स्वतंत्र ध्वजाचा विषय का महत्त्वाचा वाटतोे़? ही विघटनवादी प्रवृत्ती नाही काय? हा विषय  न्यायालयात सादर करण्याची आवश्यकताही एक घटनातज्ञ राममूर्ती शिवरामकृष्णन यांनी प्रतिपादित केली.  त्यामुळे हा वाद न्यायालयातही जाऊ शकतो.