Sat, Jul 20, 2019 23:24होमपेज › Belgaon › बंडखोरांना बेळगावात घेराव; येळ्ळुरात रोष

बंडखोरांना बेळगावात घेराव; येळ्ळुरात रोष

Published On: May 07 2018 2:04AM | Last Updated: May 07 2018 2:04AMबेळगाव, येळ्ळूर : प्रतिनिधी

मध्यवर्ती समितीच्या विरोधात बंडखोरी करून उमेदवारी जाहीर केलेल्या नेत्यांना सीमाभागात वाढता विरोध असून, रविवारी शहरातील चव्हाट गल्ली आणि येळ्ळूरमध्ये बाळासाहेब काकतकर आणि किरण सायनाक यांना लोकांनी घेराव घालून प्रचार बंद पाडला. त्यामुळे काकतकरांनी माघारी जाणे पसंद केले, तर सायनाक यांना प्रचारासाठी पोलिस बंदोबस्ताचा आधार घ्यावा लागला.म. ए. समितीमधून गट- तट विसरून एकच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात रहावा, या द‍ृष्टीने प्रयत्न झाले. मात्र, त्याला यश आले नाही. अर्ज भरण्यापासून ते अर्ज माघार घेईपर्यंत शर्तीचे प्रयत्न झाले. मात्र, दोन्ही गटांनी स्वतंत्र उमेदवार रिंगणात उभे केले. त्यामुळे उत्तर, दक्षिण, ग्रामीण व खानापूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वी फलकावर आपल्या भावना लिहून नागरिकांनी एकीचा संदेश दिला. मात्र त्यांची दखल कुणी घेतली नाही.

चव्हाट गल्लीत बंडखोर उमेदवार बाळासाहेब काकतकर प्रचारासाठी आले असता. क्रांतीसिंह नानासाहेब पाटील चौकात नागरिकांनी घेराव घालून प्रश्‍नाचा भडिमार केला. तुम्ही एकी का नाही केलीत? पैसा बघून उमेदवारी घेतलीत का? तुम्ही नेता निवडताय जावई नाही? आमचा तुम्हाला पाठिंबा नसताना तुम्ही प्रचारासाठी आलात कशाला? आमचा पाठिंबा कुणाला आहे ते आम्ही मंडळाच्या फलकावर लिहिले आहे ते तुम्हाला वाचता आले नाही काय? चुकीची माहिती वृत्तपत्रातून (पुढारी नव्हे) देऊन तुम्ही जनतेची दिशाभूल का करीत आहात? अशा प्रश्‍नांचा भडिमार बाळासाहेब काकतकर यांच्यावर करण्यात आला.  वाढता विरोध पाहून काकतकरांनी आल्या पावली माघार जाणे पसंत केले.

येळ्ळुरात रोष

किरण सायनाक यांना रविवारी येळ्ळूर ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांच्या रॅलीला विरोध करण्यासाठी म. ए. समितीचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते. याची कुणकूण सायनाक आणि त्यांच्या म्होरक्यांना लागताच त्यांनी पोलिस बंदोबस्तात ‘चोरी चोरी चुपके चुपके’  गावातून रॅली काढली.बेळगाव दक्षिण मतदारसंघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार प्रकाश मरगाळे यांच्याविरोधात किरण सायनाक यांनी बंडखोरी करून प्रचार चालविला आहे. रविवारी दक्षिण मतदारसंघात दुचाकी रॅलीचे आयोजन केले होते. येळ्ळूरमध्येही मोटारसायकल रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांना समजताच शेकडो युवा कार्यकर्त्यांनी रॅली रोखण्यासाठी गावच्या वेशीत धाव घेतली. रॅली गावच्या वेशीतच रोखून सायनाक आणि त्यांच्या म्होरक्याला जाब विचारण्यात येणार होता. संभाव्य विरोधाची कल्पना येताच सायनाक यांनी पोलिस बंदोबस्त मागवून घेतला. मोठ्या पोलिस फौजफाट्यासह आणि मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गावातून रॅली काढली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी सायनाकांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

सायनाक यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी

बंडखोर उमेदवार किरण सायनाक यांनी येळ्ळूरवासीयांचा विरोध लक्षात घेऊन पोलिस  बंदोबस्तात फेरी काढली. त्यामुळे संतप्त येळ्ळूरवासीयांनी सायनाक यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.