Thu, Apr 25, 2019 12:19होमपेज › Belgaon › खानापुरात सार्वजनिक गणेशमूर्ती शाडूच्या

खानापुरात सार्वजनिक गणेशमूर्ती शाडूच्या

Published On: Aug 04 2018 1:32AM | Last Updated: Aug 03 2018 7:29PMबेळगाव : प्रतिनिधी

घरघुती गणेशमूर्तीबरोबर सार्वजनिक श्रीमूर्तीदेखील शाडूच्याच असाव्यात, असा फतवा गतवर्षी जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी काढला होता. त्याप्रमाणे खानापुरातून सार्वजनिक गणेशमूर्ती शाडूपासून बनविण्याचे काम चालू आहे. हुबळीतील 16 सार्वजनिक मंडळांनी शाडूपासून बनविलेल्या मूर्तीची ऑर्डर खानापुरात दिली आहे. खानापुरातील चार तर ग्रामीण  गावातून पाच मूर्ती बनवून घेण्यासाठी सार्वजनिक मंडळे पुढे आली आहेत. 

शाडूपासून मूर्ती बनविली तर, मूर्तीची उंची कमी होईल. प्रदूषण विरहितत गणेशोत्सव साजरा होईल. अपघाताच्या घटना घडणार नाहीत. तलावातील पाणी ओसरल्यानंतर मूर्तीची विटंबना होणार नाही, अशी प्रशासनाची भूमिका होती. त्याला प्रदूषण मंडळाची जोड मिळाली. मात्र शाडूमध्ये मूर्तीकलेचे कसब दाखविता येत नाही, अशी सबब बेळगावातील मूर्तिकारांनी दिली होती. त्याला उत्तर म्हणून खानापुरातील देसाई गल्लीत  राजू कुंभार कलाकाराने तीन ते पाच फुटापर्यंतची सार्वजनिक गणेशमूर्ती बनविण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी गतवर्षीपासून शाडूपासून मूर्ती बनविण्याचा उद्योग सुरु केला आहे.याला चांगला प्रतिसाद लाभला असून हुबळीतील सर्वाधिक 16 मंडळांनी शाडूच्या मूर्ती नेण्याची तयारी दाखविली आहे. खानापुरातील चार मंडळांनी यंदा शाडूची मूर्ती पुजविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी  माहिती राजू कुंभार यांनी दिली.

प्रदूषण तर होतेच शिवाय गणपतीची विटंबना होते. म्हणून शाडूपासून मोठ्या मूर्ती बनविण्याचे तंत्र आत्मसात केले आहे. मंडळाच्या मागणीप्रमाणे मूर्ती बनवत असल्याने प्रतिसाद चांगला आहे.- राजू कुंभार, मूर्तिकार खानापूर