Mon, Apr 22, 2019 12:33होमपेज › Belgaon › चंद्रकांत पाटील यांच्या वक्‍तव्याचा निषेध

चंद्रकांत पाटील यांच्या वक्‍तव्याचा निषेध

Published On: Jan 25 2018 1:02AM | Last Updated: Jan 24 2018 11:32PMबेळगाव ः प्रतिनिधी

युवा आघाडीच्या माध्यमातून ग्रामीण भागात जनजागृती मेळावे घेणे, कार्यकर्त्यांना सक्रिय करून युवा आघाडी बळकट करणे, पश्‍चिम भागातील किणये येथे लवकरच युवा मेळाव्याचे आयोजन करणे आदी विषयासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. यावेळी तालुक्यात युवामेळावे घेण्याचा निर्धार घेण्यात आला. 

तालुका म. ए. समिती युवा आघाडीची बुधवारी  कॉलेज रोड येथील कार्यालयात बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी अध्यक्ष अ‍ॅड. शाम पाटील होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष दत्ता उघाडे, संजय पाटील होते. 
प्रारंभी सीमाभागाचे समन्वयकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गोकाक येथे केलेल्या वक्तव्याचा  बैठकीत निषेध करण्यात आला. 

युवा आघाडी व म. ए. समिती बळकटीसाठी तालुक्यात मेळावे घेण्यात येणार आहेत. यासाठी पूर्व भागातील मुतगा, सांबरा, निलजी तसेच पश्‍चिम भागातील उचगाव, किणये व दक्षिण भागात युवा मेळाव्याचे आयोजन करण्यासंबंधी कार्यकर्त्यांनी मते मांडली. कल्लेहोळ येथील सुभाष मरुचे म्हणाले, बेनकनहळ्ळी येथील युवा मेळावा व सावगाव येथील महिला मेळावा यशस्वी झाला. यापुढील मेळाव्यांना यापेक्षा अधिक कार्यकर्ते कसे हजर राहतील याची दक्षता घ्यावी. जनजागृती करावी. 

यावेळी अनिल पाटील (किणये), गोपाळ चौगुले(कुद्रेमानी), विनायक पाटील (कर्ले) आदींनी आपले विचार मांडले.  उपाध्यक्ष दत्ता उघाडे म्हणाले, राष्ट्रीय पक्ष युवा आघाडीत फूट पाडण्याचे प्रयत्न करत आहेत. कोणीही अमिषांना बळी पडू नये. कार्यकर्त्यांमध्ये एकी ठेवण्यासाठी मेळावे व जागृतींना जोर देणे गरजेचे आहे. 

अध्यक्ष अ‍ॅड. शाम पाटील म्हणाले, कोणताही युवा मेळावा यशस्वी करण्यासाठी गाव, विभाग पातळीवर बैठका होणे गरजेचे आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले पाहिजेत. किणये येथील मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने परिश्रम घ्यावे. तसेच तालुक्यात इतर ठिकाणीही लवकरच मेळावे घेण्यात येतील. यावेळी एम. आय. पाटील, संजय अष्टेकर, गुंडू पाटील, सचिन दळवी, सागर सावगावकर, महादेव गुरव, भरमा देसूरकर, राजू किणयेकर, भावकाण्णा मोदगेकर, नारायण गोमाण्णाचे, शिवाजी पाटील, चांगाप्पा यळ्ळूरकर, सुधीर पाटील, किरण पाटील, प्रकाश सुतार, नामदेव गावडा आदी उपस्थित होते. 

अध्यक्षांचा राजीनामा

तालुका म. ए. समिती युवा आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. शाम पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा उपाध्यक्ष दत्ता उघाडे यांच्याकडे सुपूर्द केला. तालुका म. ए. समिती युवा आघाडीच्या बैठकीत सदर राजीनामा देण्यात आला. अ‍ॅड. पाटील यांचा राजीनामा मंजूर करण्यासंबंधी अकरा जणांची कमिटी नेमण्या आली आहे. त्यांच्याकडे पूर्ण अधिकार देण्यात आले असून आठ दिवसात राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.  

अ‍ॅड. पाटील यांनी तालुक्यातील युवा वर्गाला एकत्रित करण्यासाठी काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे युवा आघाडीत चैतन्य निर्माण झाले आहे. विधानसभेची निवडणूक काही महिन्यात आहे. यासाठी अ‍ॅड. पाटील यांनी पदाचा राजीनामा देवू नये, अशी मागणी बैठकीत कार्यकर्त्यांनी केली.  अ‍ॅड. शाम पाटील म्हणाले, मी समितीचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. राजीनाम्यानंतरही माझे काम सुरुच असेल. मात्र, माझ्या काही वैयक्तिक अडचणीमुळे मी राजीनाम्याचा निर्णय दिल्याचे सांगितले.