Fri, Jul 19, 2019 01:29होमपेज › Belgaon › ‘पीएलडी’वर हेब्बाळकर गटाची सत्ता

‘पीएलडी’वर हेब्बाळकर गटाची सत्ता

Published On: Sep 08 2018 1:31AM | Last Updated: Sep 07 2018 9:49PMबेळगाव : प्रतिनिधी

भू-विकास बँकेवर (पीएलडी) आ. लक्ष्मी हेब्बाळकर गटाने सत्ता मिळविली आहे. पंधरा दिवसांपासून रंगलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपद हेब्बाळकर गटाला मिळाले. शुक्रवारी (दि.7) दिवसभर जोरदार घडामोडी घडल्या. राज्यातील मंत्र्यांनी हस्तक्षेप घेतल्यानंतरच अखेर नाट्यमय घडामोडींवर सध्यातरी पडदा पडला. 

पीएलडी बँकेचे राजकारण राज्य सरकारलाही डोकेदुखी ठरले होते. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात हायकमांडकडे तक्रारी केल्या होत्या. अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणूक 28 ऑगस्ट रोजी होणार होती. निवडणुकीदरम्यान एका संचालकाचे अपहरण झाल्याचे कारण पुढे करून तहसीलदार मंजुळा नाईक यांनी ही निवडणूक पुढे ढकलली होती. याकाळात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. यानंतर आ. हेब्बाळकर यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने 7 सप्टेंबरपूर्वी निवड प्रक्रिया राबवावी, असा आदेश बजावला होता. यामुळे शुक्रवारी निवडणूक घेण्यात आली.  कर्नाटक काँग्रेस प्रदेश कमिटीचे अध्यक्ष माजी मंत्री ईश्‍वर खांड्रे यांनी हस्तक्षेप करून दोघांतील वाद मिटविला. 

माजी मंत्री खांड्रे यांनी आ. हेब्बाळकर यांच्या निवासस्थानी   त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर सर्किट हाऊसमध्ये जाऊन जारकीहोळी बंधू व पक्षश्रेष्ठी दिनेश गुंडुराव यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला. तोडगा मान्य झाल्यानंतर अध्यक्षपदी महादेव पाटील आणि उपाध्यक्षपदी बापूसाहेब जमादार यांची निवड जाहीर करून त्यांना अर्ज करण्याची सूचना केली. अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी फक्त दोघांचेच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. निवडणुकीनंतर विजयी उमेदवार व समर्थकांनी विजयोत्सव केला. 

यावेळी माजी बुडा अध्यक्ष युवराज कदम, एपीएमसी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, चरणराज हट्टीहोळी, यल्लाप्पा ढेकोळकर आदी उपस्थित होते. 

200 पोलिसांचा फौजफाटा 

निवडणुकीवेळी महाद्वार रोड परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते. पोलिस उपायुक्त सीमा लाटकर, महानिंग नंदगावी लक्ष ठेवून होते. निवडणूक बंदोबस्तासाठी 4 सहाय्यक पोलिस आयुक्त, पंधरा पोलिस निरीक्षक, 10 पोलिस उपनिरीक्षक, 3 केएसआरपीच्या तुकड्या 2 सीएआरच्या तुकड्या असा एकून दोनशे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तहसीलदार कार्यालयाला देखील पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.