Wed, Jul 24, 2019 05:49होमपेज › Belgaon › कृषी कर्जमाफीवर शिक्‍कामोर्तब?

कृषी कर्जमाफीवर शिक्‍कामोर्तब?

Published On: Jul 01 2018 1:51AM | Last Updated: Jul 01 2018 12:41AMबंगळूर : प्रतिनिधी

राज्यातील काँग्रेस-निजद आघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक रविवारी (1 जुलै) होणार आहे.  यावेळी  शेतकर्‍यांच्या सरसकट कृषी कर्जाच्या माफीच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास 5 जुलै रोजी मुख्यमंत्री कुमारस्वामी अर्थसंकल्प मांडताना कृषी कर्जमाफीची घोषणा करतील.

शुक्रवारी काँग्रेस आणि निजदच्या किमान समान कार्यक्रम समितीची बैठक होऊन शेतकर्‍यांना सरसकट कृषी कर्जमाफी देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार 2009 पासून 31 मे 2018 पर्यंतची दोन लाखांपर्यंतची सर्व कृषीकर्जे माफ होतील. त्यात राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका आणि सहकारी संस्थांच्या कर्जांचाही समावेश आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर यांनी दिली होती. रविवारच्या बैठकीत त्यावर शिक्‍कामोर्तब होईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कमिटीचे चेअरमन माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या राहणार आहेत.

कर्जमाफीबरोबर मंडळ, महामंडळांवर नियुक्‍त करण्यात येणार्‍या अध्यक्षांबद्दलही चर्चा केली जाणार आहे. त्याशिवाय मंत्रिमंडळ विस्ताराबद्दलही महत्त्वाची चर्चा केली जाणार आहे.  किमान विकास कार्यक्रमाच्या मसुद्यालाही या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात येणार आहे. 5 जुलै रोजी मुख्यमंत्री एच. डी कुमारस्वामी हे राज्याचे अर्थखातेही सांभाळत असून ते राज्याचे अंदाजपत्रक सादर करणार आहेत.

सहकारी संघ, खासगी बँका, राष्ट्रीयीकृत बँकांमधून शेतकर्‍यांनी घेतलेल्या कर्जाची नेमकी रक्‍कम समोर आलेली नाही; पण हा आकडा सुमारे 34 हजार कोटी रुपये आहे. हा आकडा येत्या दोन दिवसांत निश्‍चित होईल. त्यानंतर कर्जाची रक्‍कम प्रत्येक शेतकर्‍याच्या खात्यावर जमा होईल.

सर्व प्रकारची  कृषी कर्जे

सुरुवातीला फक्‍त पीककर्ज माफ केले जाईल, अशी शक्यता होती. मात्र शेतकर्‍यांनी सरसकट कर्जमाफी मागितली. त्यामुळे कृषी संबंधित उपकरणे खरेदी, पाणीपुरवठ्यासाठी लागणारी यंत्रणा, विहीर-कूपनलिका खोदाईसाठी घेतलेले कर्जही माफ होण्याची शक्यता आहे. दोन लाखांपर्यंतचे कर्ज पहिल्या टप्प्यात माफ केले जाईल, असे संकेत काही मंत्र्यांनी दिले आहेत.