Sat, Aug 24, 2019 21:36होमपेज › Belgaon › सेवा केंद्रामुळे सामान्यांनाही पासपोर्ट

सेवा केंद्रामुळे सामान्यांनाही पासपोर्ट

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 14 2018 11:51PMबेळगाव : प्रतिनिधी 

देशात पूर्वी श्रीमंतवर्गच पासपोर्ट काढून विदेशवारी करायचा. आता सामान्यांनाही पासपोर्ट काढणे सुलभ झाले आहे. येथील केंद्रामुळे नागरिकांंची गैरसोय दूर होईल, असे प्रतिपादन परराष्ट्र खात्याचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांनी केले. 

येथील मुख्य पोस्ट कार्यालयात  पासपोर्ट सेवा केंद्राच्या प्रारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. खा. सुरेश अंगडी यांच्या हस्ते सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. खा. प्रकाश हुक्केरी, खा. डॉ. प्रभाकर कोरे, महापौर संज्योत बांदेकर, जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला, पोलिस आयुक्‍त डॉ. डी. सी. राजप्पा यांची प्रमुख उपस्थिती होती. 

खा. अंगडी म्हणाले, विदेश मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने केंद्र सुरू झाले. येथील जनतेची गैरसोय दूर करण्याचे माझे नेहमीच प्रयत्न असतील.

खा. कोरे म्हणाले, पोस्ट व विदेश मंत्रालय यांच्या संयुक्‍त सहकार्याने हे केंद्र सुरू झाले आहे. लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यालय गतिमान व्हावे.

खा. हुक्केरी म्हणाले, या केंद्रात सध्या मोजकेच कर्मचारी व अधिकारी आहेत. स्वतंत्र इमारत बांधकामासाठी सातत्याने पाठपुरावा करीन.

महापौर संज्योत बांदेकर म्हणाल्या, खूप दिवसांपासूनची मागणी  पूर्ण झाली आहे. खा. अंगडी यांच्या प्रयत्नांना यश आले. पासपोर्ट व पोस्ट कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक संख्येने उपस्थित होते. पोस्टाच्या हुबळी विभागीय अधिकारी वीणा श्रीनिवासन यांनी आभार मानले.