Sun, Aug 18, 2019 14:48होमपेज › Belgaon › पर्यटकांची हुल्लडबाजी ठरतेय डोकेदुखी

पर्यटकांची हुल्लडबाजी ठरतेय डोकेदुखी

Published On: Jun 23 2018 1:20AM | Last Updated: Jun 22 2018 8:33PMबेळगाव : प्रतिनिधी

सध्या वर्षापर्यटनालाही वेग आला आहे. धो, धो कोसळणार्‍या पावसाच्या सरी अंगावर झेलण्यासाठी उत्साही पर्यटकांच्या वर्षा सहली जोमात आहेत. यामध्ये सळसळत्या उत्साहाच्या युवा पर्यटकांची संख्या अधिक आहे. त्यांचा अतिउत्साह स्थानिकांची डोकेदुखी ठरत आहे. याला आवर घालण्याची मागणी होत आहे.

धुवांधार कोसळणारा पाऊस, निसर्गाने मुक्त हस्ते केलेली सौंदर्याची उधळण, धुक्यामध्ये हरवलेल्या वाटा, अंगावर शहारा आणणारी आल्हाददायक हवा या सार्‍यामुळे नजीकचा चंदगड तालुका आणि आंबोलीचा  धबधबा पर्यटकांना नेहमीच साद घालतो. पावसामुळे पर्यटनाला उधाण येते. मात्र अलीकडच्या दिवसात पर्यटनाचा आनंद लुटताना मद्यपान आणि छेडछाडीचे विकृत स्वरुप प्राप्त झाले आहे. 

सध्या आंबोली, तिलारी, स्वप्नवेल, कलानंदीगड, महिपाळगड आदी भागात निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी जाणार्‍या पर्यंटकांची संख्या वाढली आहे. बेळगाव शहरासह चिकोडी, गोकाक, सौंदत्ती, विजापूर परिसरातील पर्यटक मोठ्या संख्येने धाव घेत आहेत. यापैकी काही अतिउत्साही पर्यटकांचा रस्त्यावरील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्याच्या मूडमध्ये असतात. यासाठी सर्रास मद्याचा वापर केला जातो. मद्यप्राशन करून, बेधुंद होऊन धांगडधिंगाणा घालणार्‍या युवा पर्यटकांची संख्या वाढत आहे. बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर असे प्रकार शनिवार, रविवारी प्रामुख्याने पाहावयास मिळतात.

कर्नाटकाच्या तुलनेत सध्या महाराष्ट्रात मद्याचे दर अधिक आहेत. यामुळे बहुतांश पर्यटक कर्नाटकाच्या हद्दीतच तल्लफ भागविण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्राच्या हद्दीत पोलिसांकडून मद्याची तपासणी करण्यात येते. तत्पूर्वी कर्नाटक हद्दीतील रस्त्यावर थांबून मद्याचा आस्वाद घेतला जातो. परिणामी रस्त्याच्या बाजूच्या शिवारात मद्यपान करणार्‍या पर्यटकांचा त्रास वाढला आहे. मद्यपान केल्यानंतर रिकाम्या बाटल्या शिवारात टाकण्यात येतात. काही वेळा रस्त्यावर फोडण्याचा प्रयत्न केला जातो.

मद्यधुंद अवस्थेत बेफाम वाहने हाकण्यात येतात. यावेळी रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍या महिला, शाळेच्या विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न होतो. परिणामी रस्त्याने जाणार्‍या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.येत्या काळात हे प्रकार वाढणार आहेत. तत्पूर्वी अशा प्रकारावर आळा घालण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अन्यथा या भागातील नागरिकांकडून रास्तारोको करून आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

कारवाईची गरज

मद्यपी पर्यटकांवर आवर घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई करण्याची आवश्यकता आहे. मागील वर्षी मद्यपींवर आवर घालण्यासाठी शिनोळी आणि चंदगड येथे कारवाई करण्यात येत होती. याची धास्ती पर्यटकांनी घेतली होती. याच प्रकारची मोहीम पोलिसांनी सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.