Tue, Apr 23, 2019 19:32होमपेज › Belgaon › स्मशानभूमीत हवा तिसरा ‘डोळा’

स्मशानभूमीत हवा तिसरा ‘डोळा’

Published On: Jun 27 2018 1:19AM | Last Updated: Jun 27 2018 12:24AMबेळगाव : प्रतिनिधी

शहरात समाजकंटकांकडून दंगल होऊ नये म्हणून संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. त्याच्या जोडीला रहदारीवर नियंत्रण ठेवण्यास प्रमुख मार्गाबरोबर सिग्नल यंत्रणेवरही करडी नजर आहे. अंधश्रध्देला खतपाणी घालण्यावर नजर ठेवण्यासाठी स्मशानभूमीतही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे. याबाबत मनपाच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. स्मशानभूमीत सीसीटीव्ही, रात्रीच्या वेळी अखंडित वीजपुरवठ्यासह कायमचा वॉचमन नेमण्याचा निर्णय महापौर बसाप्पा चिक्‍कलदिनी यांनी घेतला.

‘पुढारी’च्या मंगळवारच्या अंकात ‘स्त्री अर्भक जिवंत  पुरण्याचा प्रयत्न’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले. याची दखल घेऊन स्मशानभूमीचे रखवालदार राजेश बन्स, साक्षीदार विजय सावंत यांनी शहापूर पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे. यावेळी स्मशानभूमी सेवा सुधारणा मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी पोलीस उपायुक्‍त शंकर मारिहाळ यांना संपूर्ण प्रकाराबाबतची माहिती दिली. त्याबाबत चौकशी करुन पुढील कार्यवाही करु असे आश्‍वासन मारिहाळ यांनी त्यांना दिले. शहापूर स्मशानभूमीत अर्भकाला जिवंत दफन करण्याचा अघोरी प्रकार सोमवारी उघडकीस  आला.  यानंतर त्याचे काय झाले? कोणत्या वाहनातून ते लोक आले होते? ते पुढे कोठे गेले? याची उत्तरे मिळाली नाहीत. शहापूर स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे असते असे अघोरी कृत्य करणारे कॅमेर्‍यामध्ये कैद झाले असते.

महापालिकेत चर्चेला आला विषय

मंगळवार 26 रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत माजी महापौर किरण सायनाक यांनी आता स्मशानभूमीतही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज आहे, असे सांगितले. 24 तास अखंडित वीजपुरवठा सुरु ठेवण्याची मागणी केली. ज्या स्मशानभूमीत वाचमन नाहीत, तेथे तातडीने नियुक्त करण्याचा निर्णय महापौर चिक्‍कलदिनी यांनी घेतला.