Sun, Apr 21, 2019 02:45होमपेज › Belgaon › निवृत्त जवान करणार दयामरणाचा अर्ज

निवृत्त जवान करणार दयामरणाचा अर्ज

Published On: Feb 22 2018 1:25AM | Last Updated: Feb 22 2018 1:25AMबेळगाव : प्रतिनिधी

आयुष्याच्या ऐन उमेदीत देशसेवेसाठी कार्य केले. निवृत्तीनंतर मिळालेल्या पुंजीतून हक्काचे छत्र उभारले. मात्र थोड्याच दिवसात कर्तृत्ववान मुलाचा मृत्यू झाला, यामुळे कुटुंबाचा आधार हरपला. उपजीविकेसाठी घरातच किराणा दुकान सुरू केले. यातून पोटापाण्याची सोय झाली. मात्र, मनपाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेत घरकुल हटविले जाणार असल्यामुळे माजी सैनिकाच्या डोक्यावर आभाळ कोसळले असून त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून मनपाकडे दयामरणाचा अर्ज केला आहे. 

टिळकवाडीजवळील अयोध्यानगर-गोडसेवाडी दरम्यानचा 80 फुटी रस्त्याचे रुंदीकरण स्मार्ट सिटी अंतर्गत होणार आहे. याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मनपाकडून रस्तारुंदी झाल्यास येथील 16 कुंटुंबे बेघर होणार आहेत. यासाठी मनपाने विचार करून निर्णय घेण्याची आर्त हाक निवृत्त जवान आप्पासाहेब पिंगळे यांनी दिली आहे. 

आप्पासाहेब (80)  अर्धांगवायूने त्रस्त आहेत. रुंदीकर निर्णयानंतर भीतीच्या छायेखाली असल्याची माहिती त्यांनी दिली. घरी कोणीही कमवते नसल्याने किराणा दुकानामुळे घरखर्च चालतो. दुकान त्यांची पत्नी चालवते. काही वषार्ंपूर्वी मुलाचे निधन झाले. रुंदीकरणात घराबरोबर दुकान गेल्यानंतर समस्यांचे आभाळ कोसळणार आहे. सरकारी शाळेला नातू जातात. पिंगळे माजी सैनिक असून पेन्शन व किराणा दुकानावर घर चालते.

याठिकाणी सध्या 60 फुटांचा रस्ता असताना 80 फुटी करण्याचे मनपाचे नियोजन आहे. येथील रहिवाशांचा विचार मनपाने करावा, अशी विनंती पिंगळे यांनी मनपाला केली आहे. अयोध्यानगर गोडसेवाडी वसाहतीत 60 फुटी रस्ता आहे. स्मार्ट सिटीमधून हा रस्ता 80 फुटाचा करण्याचा निर्णय झाला आहे. पिंगळे यांच्याबरोबर प्रशांत राठोड, यल्लापा जोशिलकर आदींच्या घरांचे नुकसान होणार आहे.