Fri, Apr 19, 2019 12:12होमपेज › Belgaon › लग्न परवानगी प्रक्रिया झाली सोपी

लग्न परवानगी प्रक्रिया झाली सोपी

Published On: Apr 29 2018 2:09AM | Last Updated: Apr 29 2018 12:22AMबेळगाव ः प्रतिनिधी

निवडणुकीची धामधूम सुरू असताना लग्नसोहळ्याला परवानगी मिळविण्यासाठी पोलिस स्थानकाच्या पायर्‍या नातलगांना झिजवाव्या लागत आहेत. आता थेट चलन भरून परवानगीसाठी जवळच्या स्थानकात अर्ज करून लग्नसोहळ्यात साऊंड सिस्टिम लावण्यासाठी परवानगी मिळविण्याची व्यवस्था झाली आहे. मंगल कार्यालयांनी आचारसंहितेची धास्ती घेतली असून  शॉर्ट अ‍ॅण्ड स्वीट कार्यक्रमावर भर देत आहेत. 

निवडणुकीमुळे लग्नसोहळा आयोजत करण्यास परवानगी मिळविण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी जवळच्या पोलिस स्थानकात जावून अर्ज केल्यानंतर एसी कार्यालयातून चलन भरुन त्याची पावती घेऊन ती स्थानकात दाखल करावी लागत होती.आता लग्नपत्रिका थेट ‘बेळगाव वन’ कार्यालयात भरुन त्याची पावती पोलिस स्थानकात दाखवून लग्नपत्रिकेसमवेत अर्ज करावा लागतो. तेथून पीएसआयच्या पत्राची प्रत घेऊन ती प्रांताधिकारी (एसी) कार्यालयात  नोंद करून पुन्हा त्याची नोंद महापालिकेत करावी लागत आहे. लग्न करताय मग परवानगीची आवश्यकता नाही, असे सांगण्यात येत आहे.   मात्र संबंधित स्थानकात चौकशी केली असता साऊंड सिस्टीम लावत असाल तर परवानगी अनिवार्य आहे, अशी माहिती देण्यात येते. यासाठी बेळगाव वन कार्यालयात लग्नपत्रिका दाखवून 87 रुपयाचे चलन भरावे लागते. याच्या पावतीसमवेत जवळच्या पोलिस स्थानकात लग्नपत्रिका व कार्यक्रमाची रूपरेषा असलेला अर्ज द्यावा लागत आहे. या अर्जात कार्यक्रमाची माहिती, वेळ नमूद करणे आवश्यक आहे. यानंतर पोलिस स्थानकातून  परवानापत्र मिळते. याची नोंद एसी कार्यालयात करून मनपात नोंद करणे बंधनकारक आहे.

सवंदेनशील भागात दक्षता

बेळगावातील संवेदनशील भागात लग्नसराईचे आयोजन केले असेल तर पोलिस जातीने चौकशी करून आयोजकांना स्पीकर कमी आवाजात लावा. रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करू नये, अशा सूचना देत आहेत. 

कार्यालयांनी घेतली धास्ती

बेळगावातील  मंगल कार्यालयांमध्ये सर्रास रात्रीपर्यंत हळदी समारंभाचे आयोजन केले जाते. वर व वधूकडील मित्रमंडळी डॉल्बीच्या तालावर रात्री उशिरापर्यंत ताल धरत असतात. कार्यालयात मद्यपान मोठ्या प्रमाणात होत असते. याची दखल घेऊन मंगल कार्यालयाच्या संचालकांकडून विवाह सोहळा आयोजित केलेल्यांना डॉल्बी लावू नका, मद्यपान करू नका, रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम करू नका,  अशा अटी घातल्या जात आहेत.