Fri, Jul 19, 2019 20:31होमपेज › Belgaon › ‘प्रेरणा’ योजना आता सर्व जिल्ह्यांत

‘प्रेरणा’ योजना आता सर्व जिल्ह्यांत

Published On: Jul 12 2018 1:40AM | Last Updated: Jul 11 2018 10:12PMबेळगाव : प्रतिनिधी

प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेली शालेय विद्यार्थ्यांसाठीची ‘प्रेरणा’ योजना आता राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. शाळेत होणार्‍या वेगवेगळ्या क्रीडा व इतर उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन त्यांची कौशल्य वृद्धी व्हावी या हेतूने ही योजना आखण्यात आली आहे. दावणगिरी आणि चित्रदुर्ग जिल्ह्यातील सरकारी शाळेत ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली. शिक्षण फाऊंडेशन आणि सर्व शिक्षण अभियान (एसएसए) यांनी संयुक्तपणे ही योजना आखून याची अंमलबजावणी सुरू केली आहे. 

शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच इतर उपक्रमातही विद्यार्थ्यांचा सहभाग त्यांच्या शैक्षणिक अभिवृद्धीसाठी आवश्यक असतो. ही योजना चौथी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आता सर्व जिल्ह्यातून राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक शिक्षण विभागाचे संचालक एस. कुमार यांनी दिली.  चालू शैक्षणिक वर्षातच सर्व जिल्ह्यातील सरकारी शाळातून प्रेरणा योजना राबविण्यात येणार आहे. यापूर्वी विविध संस्थांनी अध्यापन आणि अध्ययन दर्जेदार व्हावे यासाठी भरपूर प्रयत्न केले. परंतु त्यांना मर्यादा येत आहेत. चित्रदुर्ग आणि दावणगिरी जिल्ह्यात प्रेरणाची अंमलबजावणी झाल्यानंतर तेथील सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये मोठा सकारात्मक बदल दिसून आला. हे विद्यार्थी अभ्यासाबरोबरच इतर कार्यक्रमातही हिरीरीने भाग घेत असल्याचे दिसून आले. गणित आणि इंग्रजी विषयात या विद्यार्थ्यांची विशेष चमक दिसून आली. 

शिक्षण फाऊंडेशनने सार्वजनिक शिक्षण विभागाला निवेदन देऊन मोजक्या सरकारी शाळेतून प्रेरणा योजना कार्यवाहित आणण्याची कल्पना दिली. फाऊंडेशनच्या वतीने अंमलात येणार्‍या विविध शाळापूरक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागीव्हावे हा मुख्य उद्देश आहे. शाळेत नियमित उपस्थिती, उत्तम वर्तणूक, अभ्यास करताना एकाग्रता आणि इतर कौशल्ये वृद्धींगत व्हावीत यासाठी फाऊंडेशन प्रयत्नशील आहे. अशी चमक दाखविणार्‍या विद्यार्थ्यांना स्तुती प्रमाणपत्र बक्षिसे आदी देऊन गौरविण्यात येते.