Tue, Jun 18, 2019 20:41होमपेज › Belgaon › शाळा विलिनीकरणाचा तूर्तास धोका टळला

शाळा विलिनीकरणाचा तूर्तास धोका टळला

Published On: Jul 10 2018 1:01AM | Last Updated: Jul 09 2018 8:07PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्यातील 20 पटसंख्या असलेल्या शाळांचे विलिनीकरण करणार, असे  विधान परिषदेमध्ये सरकारने घोषित केले होते. मात्र शिक्षणतज्ज्ञ, विविध संघटनांकडून होणार्‍या विरोधामुळे तूर्तास तरी विलिनीकरण टळले आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एन. महेश यांनी सरकारी शाळा बंद, विलिनीकरण करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. राज्यातील सुमारे 28,000 सरकारी शाळा बंद करण्याची तयारी चालविली होती.  सर्व माहिती एकत्रित करून एक कि. मी.  अंतरावर  असलेल्या शाळांमध्ये संबंधित शाळांचे विलिनीकरण करण्यात येणार होते. यामुळे  सरकारी शाळा बंद  होणार होत्या. अनेकांना दूरवरुन शाळांतून शिक्षणासाठी जावे लागणार होते.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गंत प्रत्येकाला हक्काचे शिक्षण मिळालेच पाहिजे, त्यासाठी तडजोड करावीच लागणार आहे. सरकारी शाळांतील समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. शाळा बंद हा उपाय नाही. त्यामुळे सरकारने अखेर नरमाईची भूमिका घेतली. सरकारी शाळा बंद केल्यास मोठा विरोध होणार होता. मराठी, कन्नड व ऊर्दू माध्यमांच्या शाळांवर टाच येणार होती. सरकारी शाळा बंद झाल्यास मातृभाषेतील शिक्षण संपणार होते. सरकारी शाळांतून शिक्षकांची कमतरता आहे. काही शाळांतून एक शिक्षक चार वर्ग सांभाळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती कशी होणार? शिक्षण खात्याने अतिथी शिक्षकांची नियुक्ती सुरू केली आहे. याचबरोबर दहा हजार शिक्षक भरती सुरू केली आहे. पात्रधारकच कमी आहेत. त्यामुळे शाळांतून शिक्षकांची वानवा आहे. 

सरकारी शाळांतून एलकेजी-युकेजी

सुमारे एक हजार सरकारी शाळांतून एलकेजी-युकेजी वर्ग सुरू करण्ययात येणार आहेत. सरकारी शाळांतील पटसंख्यावाढीसाठी उपयुक्त होणार आहे. पहिल्या टप्प्यात 1000 शाळांतून इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा हालचाली सुरू आहेत. सरकारी शाळांतील इंग्रजी विषयला महत्त्व दिले आहे. खासगी शाऴांना स्पर्धा करायची असेल तर इंग्रजीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र इंग्रजी शाळा सुरू केल्यास मातृभाषेतील शिक्षणास मोठा धोका आहे. यासाठी इंग्रजी शाळांसाठी विरोध होत आहे. सरकारी शाळांतील इंग्रजी विषय सुधारण्यासाठी सुरूवातीपासून इंग्रजी धडे गिरविल्यास अडचण येणार नाही. 

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 184 शाळांचे विलिनीकरण होणार होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खानापूर तालुक्यातील 91 शाळा होत्या. त्यामध्ये 83 मराठी माध्यमांच्या होत्या. उर्वरित 8 ऊर्दू माध्यमाच्या होत्या. बेळगाव शहर 16, बेळगाव ग्रामीण 20 शाळा,  बैलहोंगल 15, रामदुर्ग 15,  सौदत्ती 22 व सर्वात कमी 5 शाळा कित्तूर तालुक्यातील आहेत. सरकारी शाळांना दर्जा, इमारती, शिक्षक आदी सुविधा दिल्यास पटसंख्या घटणार नाही.