Tue, Jun 25, 2019 15:08होमपेज › Belgaon › सहनशक्‍तीचा अंत, सरकार कोसळले तरी चालेल!

सहनशक्‍तीचा अंत, सरकार कोसळले तरी चालेल!

Published On: Jan 12 2019 1:31AM | Last Updated: Jan 12 2019 8:46AM
बंगळूर : प्रतिनिधी

प्रदेश काँग्रेसवर वचक ठेवण्याच्या नादात समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या काँग्रेस-निजद आघाडी सरकारवर हक्‍क गाजविण्याचा प्रयत्न करत आहेत. यापुढे सरकार कोसळले तरी चालेल; पण आणखी सहन करणार नसल्याची नाराजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी आपल्या निकटवर्तीयांसमोर व्यक्‍त केल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सिद्धरामय्या हे सरकारवर वचक ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या धोरणामुळे आपल्या पक्षाचा बळी देणार नाही. आपल्या मर्जीतील आमदारांना त्यांनी मंत्रिपदी बसविले आहे. यामुळे सरकारवर त्यांचा प्रभाव राहणार हे निश्‍चित आहे. आगामी काळात होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सरकारचा वापर होणार असल्याने मुख्यमंत्रिपदाला वाईट नाव येण्याची शक्यता आहे. सत्तेवर आल्यानंतर शेतकर्‍यांची कर्जमाफी, फेरीवाल्यांना छोट्या रकमेचे कर्ज आदी योजना जारी केल्या आहेत. तरीही आपले नाव वाईट झाले तर काय करायचे? अशी भीती त्यांनी निकटवर्तीयांसमोर व्यक्‍त केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे काही आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आतापर्यंत त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. सुमारे 15 आमदार अजूनही भाजपप्रवेशाच्या तयारीत आहेत. ते गेले तरी आता काळजी नाही. त्यांना अडविणार नाही. गेल्या सात महिन्यांपासून मुख्यमंत्रिपदी राहून चांगले कार्य केले आहे. जनतेच्या हितासाठी दिवसरात्र परिश्रम घेत असताना निजदकडून काँग्रेसवर दबावाचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप दररोज केला जात आहे. यापुढे असे ऐकून घेणे आता अशक्य आहे. आता सरकार कोसळले तरी कोणतीच काळजी नसल्याचे दु:ख त्यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे व्यक्‍त केल्याचे समजते.

काँग्रेसचे आठ नाराज आमदार ‘नॉट रिचेबल’

मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असणारे सुमारे 8 आमदार काँग्रेसच्या संपर्काबाहेर आहेत. यामुळे काँग्रेस-निजद आघाडी सरकारमधील तळमळ वाढली आहे. गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्यासह सर्व नाराज आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. 

जारकीहोळींसह बेळगाव जिल्ह्यातील तीन आमदार, बळ्ळारीचे दोन आमदार आणि रायचुरातील एक आमदार काँग्रेससाठी ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. त्या सर्व आमदारांना एकत्र आणून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. मात्र, त्यात अपयश आले. संक्रांतीनंतर राज्यातील राजकारणात मोठे बदल होणार असल्याचे वृत्त पसरल्यानंतर नाराज आमदारांनी भाजपशी जवळीक साधली आहे.

बेळगावातील राजकारण थंड झाल्यानंतर आता बळ्ळारीतील राजकारण तापले आहे. आमदार बी. नागेंद्र यांनी मंत्रिपदासाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला. पण, त्यांना अपयश आले. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ते काँग्रेसच्या संपर्काबाहेर आहेत. जारकीहोळींसह नाराज आमदारांच्या गुपचूप हालचाली सुरू आहेत.