Tue, Sep 17, 2019 18:13होमपेज › Belgaon › गाय दूध उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले

गाय दूध उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले

Published On: Jul 07 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 11:34PMबेळगाव : प्रतिनिधी

गेल्या 8 दिवसांपासून महाराष्ट्रातील दूध संस्थांनी बेळगाव जिल्ह्यातील गाय दूध उत्पादकांना एक दर आणि महाराष्ट्रातील दूध उत्पादकांना एक दर असा भेेदभाव केला आहे. गायीच्या दुधाला प्रतिलिटर 5 रुपये दर कमी केल्याने सीमाभागातील गाय दूध उत्पादकांचे अर्थकारण कोलमडले आहे. 

महाराष्ट्रातील दूध संस्थांच्या या निर्णयामुळे लाखो रुपयांचा तोटा शेतकरी दूध उत्पादकांना सोसावा लागत आहे. महाराष्ट्रातील संस्थांना जादा दूध संकलनासाठी काही वर्षापासून सीमाभागाचा आधार घ्यावा लागला. सीमाभागात वासरू संगोपन योजना राबवून लाखो लिटर दुधाचे संकलन करण्यात आले. मात्र सध्या येथील गाय दुधाचा दर 5 रु. कमी करून  उत्पादकांवर अन्यायच केला आहे, असा आरोप करण्यात येत आहे. 

सीमाभागातील शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने गायींसह म्हशीही खरेदी केल्या. एकेका शेतकर्‍यांनी गाय खरेदीसाठी पाच पाच लाख रुपये गुंतविले आहेत. या शेतकर्‍यांची अवस्था सध्या आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. दूध संस्थांच्या या निर्णयाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे बेळगाव परिसरातील सहकारी आणि खासगी दूध संघावर परिणाम झाला असून यात दूध उत्पादकच भरडून गेला आहे. स्थानिक दूध उत्पादकांना अन्य दूध संघाकडे वळावे लागले आहे. त्यामुळे अतिरिक्त दुधाचे कारण पुढे करून स्थानिक दूध संघांनीही महाराष्ट्रातील दूध संस्थांचे अनुकरण केले आहे. 

महाराष्ट्रातील दूध संस्थांनी दरात घट केल्याचा परिणाम स्थानिक खासगी दूध संघांना पुरवठा करणार्‍या उत्पादकांवर झाला आहे.  मात्र कर्नाटक मिल्क फेडरेशनकडे पुरवठा करणार्‍या दूध उत्पादकांवर कोणताही परिणाम झाला नाही केएमएफकडे  दिवसाकाठी 2.50 लाख लिटर दुधाचे संकलन होते. यामध्ये 90 टक्के दूध हे गायीचे आहे. तर केवळ 10 टक्केच म्हैस दुधाचे संकलन होते. मात्र सर्वच गावात  केएमएफचे दूध संकलन केंद्र नाही.