Tue, Jul 23, 2019 10:30होमपेज › Belgaon › जीपीएसप्रमाणे सर्व्हेची शेतकर्‍यांची मागणी

जीपीएसप्रमाणे सर्व्हेची शेतकर्‍यांची मागणी

Published On: Jul 07 2018 1:34AM | Last Updated: Jul 06 2018 11:41PMबेळगाव : प्रतिनिधी

नाल्यात प्रत्यक्षात 20 ते 30 फूट अतिक्रमण झाले असता. केवळ 10 फूट झाल्याचे दाखवून तहसीलदार मंजुळा नाईक यांनी सरंक्षक भिंत गुरुवारी हटविली आहे. पण पुन्हा जीपीएसनुसार नाल्याचा नवीन सर्व्हे करून अतिक्रमण हटविणे गरजेचे आहे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

बळ्ळारी नाला अतिक्रमण हटविण्याचे शासनाने केवळ नाटक करून शेतकर्‍यांच्या डोळ्यात धुळफेक  चालविली आहे. नाल्याची लांबी 22 कि. मी. असून रुंदी 120 फूट आहे. शेजारी असलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनी नाल्यात गेल्या आहेत. नाल्याच्या बाजूने 50 मीटर बफर झोनची तरतूद असताना जागामालक धोंगडी यांनी अतिक्रमण करुन बांधकाम केले कसे? त्यांना बांधकाम परवानगी कुणी दिली? हे प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. अतिक्रमण हटविले तरी नाल्यात भराव टाकून यापूर्वी अतिक्रमण केले आहे, त्याचे काय असा प्रश्‍न  शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

हलगाजवळ सर्व्हे नं. 85/5 या नाला जमिनीत महेंद्र धोंगडी यांनी अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. बांधकाम केल्यामुळे पारंपरिक गाडे मार्ग बंद झाला. या भागातील हलगा, जुने बेळगाव, वडगाव, शहापूर व अनगोळ भागातील सुमारे 300 शेतकर्‍यांना रहदारीचा मार्ग बंद झाला आहे. 

बांधकाम केल्याने  पावसाळ्यात पाच गावांतील शिवारात पाणी फुगण्याची शक्यता आहे. यापूर्वी सर्व समस्या शासनाच्या निदर्शनास आणूनदेखील बांधकाम हटविण्यात आलेले नव्हते.

आमदारांची  आज भेट घेणार

बळ्ळारी नाला अतिक्रमण हटविण्यासंदर्भात यापूर्वी देखील निवेदन दिले आहे. परत त्याचा पाठपुरावा करण्यासाठी दक्षिणचे आमदार अभय पाटील यांची भेट घेणार असल्याची माहिती शेतकर्‍यांनी दै. पुढारीला दिली.

मुख्यमंत्र्यांकडे मागणार दाद

अतिक्रमण हटविण्यासाठी केवळ सरंक्षण भिंत पाडली आहे. नाल्यामध्ये भराव  टाकला आहे तो हटविला नाही. त्यामुळे परत पावसाळ्यात परिस्थिती जैसे थे राहणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार आहे, अशी माहिती शेती बचाव समिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू मरवे यांनी दिली.

बफर झोन नियमाप्रमाणे बळ्ळारी नाल्याच्या बाजूला 50 मीटरपर्यंत कायमस्वरुपी बांधकाम करता येत नाही. तरी नियम धाब्यावर बसवून बांधकाम झाले आहे. सर्व्हे पुन्हा करुन बळ्ळारी नाला अतिक्रमणमुक्त करावा. -जितेंद्र चौगुले शेतकरी 

आपल्या मालकीची दहा गुंठे जमीन बळ्ळारी नाल्यात गेली आहे. म्हणून आपण ती मिळविण्यासाठी पुन्हा अतिक्रमण करायचे का? असे प्रत्येकजण करु लागला तर नाल्याच्या पाण्याने जावे कोठून. त्यात शेतकर्‍यांचेच नुकसानच होणार  आहे. यामुळे याचा विचार करायला हवा. -सतीश खन्नूकर, शेतकरी