Thu, Apr 25, 2019 11:40होमपेज › Belgaon › चिकोडी जिल्ह्यासाठी स्वामी रस्त्यावर

चिकोडी जिल्ह्यासाठी स्वामी रस्त्यावर

Published On: Mar 03 2018 1:52AM | Last Updated: Mar 02 2018 8:48PMचिकोडी : प्रतिनिधी

चिकोडी जिल्ह्याच्या निर्मितीच्या मागणीसाठी होत असलेल्या  बेमुदत उपोषणाच्या 25 व्या दिवशी गुरूवारी जिल्ह्यातील विविध मठांच्या 20 हून अधिक स्वामींनी रस्त्यावर उतरुन आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला.

श्रीशैल पीठाचे जगदगुरु डॉ.चन्नसिध्दराम पंडिताराध्य स्वामी व निडसोशी पंचम शिवलिंगेश्‍वर स्वामींच्या नेतृत्वाखाली सकाळी 9 वा. शहरातील आंबेडकर उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन रॅलीस सुरु करण्यात आली. बसव सर्कलमार्गे बसवेश्‍वरांच्या व संत कनकदासांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मिनी विधानसौधसमोरील आंदोलनस्थळापर्यंत रॅली काढण्यात आली. उपोषणाच्या ठिकाणी सुमारे 20 स्वामींनी तीन तासाहून अधिक काळ धरणे आंदोलन करुन तहसीलदार चिदंबर कुलकर्णींना जिल्हा मागणीचे निवेदन सादर केले.

श्रीशैल पीठाचे जगदगुरु डॉ. चन्नसिध्दराम पंडितराध्य स्वामी म्हणाले, सर्व नेत्यांनी एकत्र शासनावर दबाव टाकल्यास जिल्ह्याची निर्मिती निश्‍चित होऊ शकते. यासाठी आपण व सर्व मठांकडून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविणार आहे.  बी. आर. संगाप्पगोळ म्हणाले, जिल्ह्याच्या आंदोलनात स्वामींनी भाग घेतल्यामुळे आंदोलनास  ऊर्जा मिळाली आहे.  

हुक्केरी मठाचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी,  माजी आ. बाळासाहेब वड्डर, डी. टी. पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बेल्लद बागवोडीचे शिवानंद स्वामी, उळागड्डी खानापूरचे मुरुळसिध्द शिवाचार्य हिरेमठ स्वामी, कब्बूर रेवणसिध्द शिवाचार्य स्वामी यांच्यासह कमतेनट्टी, भेंडवाड, अथणी, जमखंडी, सदलगा, डोणवाड, भोजसह विविध मठांचे 20 हून अधिक स्वामीजी व  आंदोलक उपस्थित होते.  

दहा हजार पत्रे पाठविणार

चिकोडी जिल्ह्यासाठी एकाच वेळी दहा हजार पत्रे मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचा उपक्रम घेणार असल्याचे चिंचणी अल्लमप्रभू स्वामीनी सांगितले.