होमपेज › Belgaon › अमृत योजनेतील ‘ते’ सर्व्हिस चेंबर अखेर रद्द

अमृत योजनेतील ‘ते’ सर्व्हिस चेंबर अखेर रद्द

Published On: Jul 01 2018 1:51AM | Last Updated: Jun 30 2018 11:09PMबेळगाव : प्रतिनिधी

भांदूर गल्ली, अनगोळ येथे बांधण्यात येणारे सर्व्हिस चेंबर अखेर रद्द करण्याचा निर्णय अमृत योजनेसंंबंधी बोलाविण्यात आलेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर मधुश्री पुजारी होत्या. 

सदर सर्व्हिस चेंबर ड्रेनेजलाईनपेक्षा दोन फूट उंचावर बांधण्यात येत होते. नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी तक्रार करून ते  बांधकाम बंद पाडले होते. त्यासंबंधी शुक्रवारी उपमहापौरांच्या चेंबरमध्ये अधिकारी व नगरसेवकांची बैठक घेऊन ते सर्व्हिस चेंबर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याऐवजी 30 मीटरवर बांधण्यात येणार्‍या चेंबर ऐवजी 15 मीटरवर एकप्रमाणे चेंबर बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याशिवाय ड्रेनेजलाईनच्या मध्यावर एक सर्व्हिस चेंबर बांधून देण्यास अमृत योजनेचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अशोक रेड्डी यांनी संमती दिली आहे. 

सदर ड्रेनेजलाईन हलगा येथे बांधण्यात येणार्‍या सांडपाणी प्रकल्पाला जोडण्यात येणार आहे. त्याबरोबरच अनगोळ, येळ्ळूर, वडगाव, जुने बेळगाव, बसवणकुडची येथील शेतकर्‍यांनी ड्रेनेजचे पाणी बळ्ळारी नाल्यामध्ये सोडण्यास तीव्र विरोध केला आहे. येळ्ळूर ग्रामपंचायतीने तर सांडपाणी शिवारात शिरत असल्याने शेतकर्‍यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. त्यासाठी ते सांडपाणी बळ्ळारी नाल्यात सोडण्यात येऊ नये, या मागणीचा ठराव ग्रामपंचायत बैठकीमध्ये मंजूर केला आहे.

त्याची दखल महापालिका व कर्नाटक शहर पाणीपुरवठा व भुयारी गटार योजना मंडळाने घेतली असून बळ्ळारी नाल्याच्या बाजूने मोठी ड्रेनेजलाईन घालून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या ठिकाणी नेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. त्यामुळे बळ्ळारी नाल्यामध्ये सोडण्यात आलेले सांडपाणी पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची चर्चाही या बैठकीमध्ये करण्यात आली. बैठकीला मराठी गटनेते संजय शिंदे,  नगरसेवक विनायक गुंजटकर, मनोहर हलगेकर, माजी उपमहापौर नागेश मंडोळकर, अमृत योजनेचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अशोक रेड्डी उपस्थित होते.