Mon, Jul 22, 2019 13:12होमपेज › Belgaon › पावसातही ‘हर हर महादेव’चा घोष

पावसातही ‘हर हर महादेव’चा घोष

Published On: Aug 14 2018 1:08AM | Last Updated: Aug 13 2018 11:41PMबेळगाव : प्रतिनिधी

श्रावणातल्या पहिल्या सोमवारी (दि.13) शहरातील शिवालयांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच मंदिरात लघु रुद्राभिषेक, तैलाभिषेक, आरती असे अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले. 

पहाटेपासूनच ‘हर हर महादेव’च्या घोषाने शहर आणि परिसरातील मंदिरे गजबजली होती. शिवपिंडीवर दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक, बेलाची पाने, फळे-फुले, तांदळाची शिवमूठ वाहून पूजा करण्यात आली.

शहरातील महादेव मंदिरात सकाळपासूनच भाविकांची लगबग सुरु होती. फुलांच्या बाजारात फुले, बेलपानांच्या खरेदीसाठी भाविकांची गर्दी झाली होती. दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या कपिलेश्वर देवस्थानात श्रावण सोमवारनिमित्त महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यात आला. कपिलेश्वर देवस्थानासह सर्वच मंदिरे गर्दीने फुलून गेली होती. उपनगर व ग्रामीण भागातील शिवमंदिरांतसुद्धा गर्दी होती. श्रावण सोमवारनिमित्त रविवारी संध्याकाळी सर्व मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. 

कॅम्पमधील बिस्किट महादेव मंदिर, महादेव गल्लीतील उमारामेश्वर, जुने बेळगाव येथील कलमेश्वर मंदिर, मिलिटरी महादेव मंदिर, चावडी गल्ली, वडगाव येथील मल्लिकार्जुन देवस्थान मंदिर, अनगोळ येथील कलमेश्वर मंदिर, मिरापूर गल्ली येथील महादेव मंदिर अशा अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम पार पडले. 

यानिमित्ताने शिवलिंगाची फुलांनी आरास करण्यात आली होती. लघुरुद्र, शिवआवर्तन असे विविध धार्मिक विधी झाले. मंदिराबाहेर हार, फुले, श्रीफळ, बेल व पूजा साहित्याची विक्री करणारे स्टॉल लागले होते. बहुसंख्य मंदिरांतून महिलांची विशेष गर्दी दिसून आली. श्रावण सोमवारनिमित्त अनेक मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विविध मंदिरांत भजन, कीर्तन, नामजप आदी कार्यक्रम उत्साहात झाले. शहर व तालुक्यात भक्तिमय वातावरण दिसून आले.  

सोमवारी उपवास असल्याने केळी, खजूर, साबुदाणा, वर्‍याचे तांदूळ, शेंगदाणा आणि उपवासाच्या साहित्याची आवकही वाढली आहे. हिंदू धर्मात श्रावण धार्मिक महिना म्हणून ओळखला जातो. प्रत्येक सोमवारला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी शंकराची आराधना करून उपवास केला जातो.

कपिलेश्वर मंदिरात 150 लिटर दूध वाटप 

दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या कपिलेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मंडळातर्फे भाविकांना 150 लिटर दुधाचे वाटप करण्यात आले. भाविकांनी याचा लाभ घेतला.

तालुक्यातील मंदिरांतही विशेष पूजा 

तालुक्यातील शिवमंदिरांमध्ये श्रावण सोमवारनिमित्त विशेष पूजा करण्यात आली. देवरवाडी येथील वैद्यनाथ मंदिर, काकती येथील सिद्धेश्वर मंदिर, कंग्राळी बुद्रक येथील कलमेश्वर मंदिर आदी ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम झाले. सर्वच मंदिरांमध्ये सकाळपासून भाविकांची गर्दी होती.