Tue, Jul 23, 2019 02:17होमपेज › Belgaon › ‘घर की बेटी’समोर आव्हाने मोठी

‘घर की बेटी’समोर आव्हाने मोठी

Published On: Jun 06 2018 1:41AM | Last Updated: Jun 05 2018 10:49PMबेळगाव : प्रतिनिधी

आपल्या घरातलीच मुलगी समजून मत द्या, अशी मागणी करणार्‍या लक्ष्मी हेब्बाळकर ग्रामीण मतदारसंघात विक्रमी मताने विजयी झाल्या. आता आ. हेब्बाळकर यांच्यासमोर आव्हांनाचा डोंगर उभा आहे. करडीगुद्दी ते कुद्रेमानी या सुमारे 50 कि. मी. च्या टापूत विस्तारलेल्या मतदारसंघात ठाण मांडून बसलेल्या समस्या कशा प्रकारे सोडविल्या जातात, याबाबत मतदारसंघात उत्सुकता आहे. एकेकाळी म. ए. समितीचा  अभेद्य किल्ला आणि त्यानंतर भाजपचा  गड ओळखल्या जाणार्‍या मतदारसंघात हेब्बाळकर यांनी जोरदार धडक देवून विजय खेचून आणला. त्यांनी मिळविलेले मताधिक्य भल्याभल्यांना अचंबित करून गेले. त्यांना आता काळात समस्यांना भिडण्याचे धाडस दाखवून लोकांना अचंबित करावे लागणार आहे. 

बेळगाव ग्रामीण शेतीप्रधान मतदारसंघ असला तरी एकही पाणीपुरवठा योजना नाही. अनेक गावांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तुरमुरी येथील कचरा डेपो नागरिकांची डोकेदुखी बनला आहे. राकसकोप येथील धरणाच्या पाण्याचा फायदा केवळ शहराला होत आहे. मराठी भाषिकांना मराठी कागदपत्रांचा प्रश्न सतावत आहे. यासह कृषि उत्पन्नाला चांगला दर, शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखणे या सार्वत्रिक समस्या या मतदारसंघातही आहेतच. त्या सोडवण्यासाठी आ. हेब्बाळकरांना झटावे लागेल. 

पिण्याचे पाणी

मतदारसंघातील गावामध्ये पाणी समस्या गंभीर आहे. कोणत्याही गावासाठी  शाश्‍वत स्वरुपाची पाणी योजना नाही. मतदारसंघातून वाहणार्‍या एकमेव मार्कंडेय नदीचा वापर पाण्यासाठी फारसा होत नाही. शिरूर डॅम व गोकाक डॅम येथून पूर्व भागातील काही गावांना पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र पश्‍चिम भागातील गावातील वेगळी पाणीपुरवठा योजना सुरू करावी लागेल. 

शिवारातील रस्ते

शिवारातील रस्त्यांची समस्या नागरिकांना सतावत आहे. प्रत्येक गावात शिवारातील रस्त्यांची अवस्था दयनीय स्वरुपाची झाली आहे. यामुळे शेतकर्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषत: पावसाळ्यात ही समस्या अधिक प्रमाणात जाणवते. अनेकदा दुर्घटना घडल्या आहेत. अनेक गावांना भेडसावणारी ही समस्या सोडविण्यास अग्रक्रम द्यावा लागेल.

धरणाचे पाणी कधी?

राकसकोप धरणातून बेळगाव शहराला पाणी पुरवठा होतोे. मात्र या भागातील अनेक गावे पिण्याचे पाणी आणि शेतीचे पाण्याापासून वंचित आहेत. या भागातील अकरा गावांना राकसकोप धरणातील पाणी पुरविण्याची योजना असल्याचे याआधी जाहीर करण्यात आले होते. मात्र मार्कंडेय काठावरील बेळवट्टी, बिजगर्णी, राकसकोप, यळेबैल, सोनोली, बेळगुंदी, कल्लेहोळ, उचगाव, सुळगा, आंबेवाडी, हिंडलगा या गावांना राकसकोप धरणाचे पाणी मिळालेला नाही. आ. हेब्बाळकर या गावांना धरणाचे पाणी देणार का, हा प्रश्न आहे.

तुरमुरी कचरा डेपो

तालुक्यातील पश्‍चिम भागातील तुरमुरीत, उचगाव, कोनेवाडी, बसुर्ते, बाची, कल्लेहोळ या गावांची डोकेदुखी बनलेला तुरमुरी कचरा डेपो हटविण्याची मागणी दहा वर्षांपासून होत आहे. वेळोवेळी आंदोलने छेडण्यात आली होती. कचरा डेपो हटविण्याचे आश्‍वासन आ. हेब्बाळकर यांनी निवडणुकीपूर्वी दिले होते. त्याची पूर्तता करण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. हा डेपो निर्जन ठिकाणी स्थलांतर करण्याचे आव्हान मोठे असेल.

शाळांची बिकट स्थिती 

मतदारसंघातील मराठी, कन्नड माध्यमाच्या शाळांची दुरवस्था झाली आहे. अनेक शाळांच्या इमारती धोकादायक आहेत. पावसाळ्यात धोकादायक इमारती जीवघेण्या ठरू शकतात. त्यामुएळ त्या इमारतींची दुरुस्तीची कामे हाती घ्यावी लागेल. त्याचबरोबर नवीन खोल्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ढासळत्या शैक्षणिक दर्जावरही लक्ष ठेवणे अपेक्षित आहे. 

मराठी कागदपत्रे मिळणार कधी?

मतदारसंघात 80 टक्के जनता मराठी मराठी भाषिक आहे. मराठी मतदारांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात काँग्रेसला मतदान केले. काँग्रेसने निवडणुकीपूर्वी मराठी भाषिकांना कानडीबरोबर मराठीतून कागदपत्रे मिळवून देण्याची ग्वाही दिली होती. त्याची जाण ठेवून आ. हेब्बाळकर यांना कर्नाटक सरकारकडून मराठीतून कागदपत्रे मिळवून देण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. त्याचबरोबर ग्रा. पं., ता. पं. व  जि. पं. मधील कागदपत्रे व कामकाज मराठीतून चालविण्याबाबत सूचना करावी लागणार आहे.