Thu, Jun 27, 2019 01:32होमपेज › Belgaon › पाठदुखी, मणक्याच्या विकारांना आमंत्रण : पालकांच्या अपेक्षांनीही मुले दबली

दप्‍तराचे ओझे वाढता वाढे !

Published On: Aug 04 2018 1:32AM | Last Updated: Aug 03 2018 7:34PMखानापूर : वासुदेव चौगुले

लहान मुलांचे शालेय जीवन हे आनंददायी आणि उत्साहात असले पाहिजे. मात्र तसे न होता आजकाल शाळांमध्ये मुलांच्या पाठीवर क्षमतेपेक्षा अधिक ओझे लादण्यात येत असल्याने त्यांना पाठीच्या दुखण्यासह विविध प्रकारच्या व्याधींना सामोरे जावे लागत असल्याचे सार्वत्रिक चित्र नजरेस पडत आहे.

आधीच पालकांच्या अपेक्षांचे ओझे आणि त्यात दप्तराचे ओझे यामुळे मुलांना स्पर्धेत ढकलण्याच्या प्रयत्नात त्यांच्या आरोग्याकडे पालकांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. देशाचे भविष्य म्हणून ज्या मुलांकडे आशेने पाहिले जात आहे. आज त्यांच्याच पाठीवर स्कूल बॅगेच्या रुपात त्यांच्या वजनापेक्षा अधिक वजनाचे ओझे लादले जात आहे. त्यामुळे बहुतांश मुलांना लहान वयातच ओझ्यामुळे पाठदुखी, पाठीच्या कण्यात बाक येणे, तसेच बसण्याच्या योग्य पद्धतीमध्येही बदल निर्माण होत आहे. परिणामी अभ्यासात एकाग्रता नसणे, सततचे दुखणे आणि पाठदुखीच्या तक्रारी वाढत आहेत.

पहिलीपासूनच पाच ते सहा विषयांची पुस्तके, तेवढ्याच वह्या आणि अन्य साहित्य दप्तरातून वाहावे लागत असल्याने कोवळे जीव शाळेत पोहचण्याआधीच थकलेले जाणवतात. शाळेहून घरी परतताना पुन्हा तीच अवस्था असल्याने गृहपाठ करण्याइतपतही त्राण त्यांच्या अंगात नसल्याचे जाणवते. याबाबत पालकवर्गातून कुरबूर केली जाते. मात्र शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार करण्याचे टाळले जाते. परिणामी ओझ्यातून ओझ्याकडे असा विद्यार्थ्यांचा प्रवास सुरुच आहे.

पालकांकडून भरमसाठ अपेक्षा लादल्या जात असल्याने अभ्यासाबरोबरच संगीत, नृत्य, खेळ यांचे जादाचे तास आणि शालेय गृहपाठ या सर्व बाबींचा ताण पडत असल्याने शारीरिक व मानसिकदृष्ट्या विद्यार्थी होरपळत असल्याचे दिसून येत आहे. अनेक शाळांत प्रत्येक दिवसाचे विविध विषयांचे वेळापत्रक असले तरी रोज रोज दप्तर भरण्याचे त्रास टाळण्यासाठी सर्वच विषयांची पुस्तके व वह्या नेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल असतो.

प्री नर्सरी आणि नर्सरीला बॅगलेस, पहिली ते दुसरी दीड किलो, तिसरी ते पाचवी दोन किंवा तीन किलो, तर सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांना चार किलोपेक्षा अधिक दप्तराचे ओझे नसावे. दहावीच्या विद्यार्थ्यांनाही सहा किलोपेक्षा अधिक वजनाचे ओझे पाठीवर देता कामा नये, असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, मुलांना आपल्या वजनाइतक्याच ओझ्याच्या स्कूल बॅग उचलाव्या लागत असल्याने सकाळी शाळेला जाताना व सायंकाळी शाळेहून घरी आल्यानंतर मुले अर्धमेली झाल्याचे दृष्टीस पडत आहे. 

शरीराच्या क्षमतेपेक्षा अधिक वजनाचे ओझे सतत वाहिल्याने कालांतराने दुखणे सुरु होण्याची दाट शक्यता असते. पाच ते पंधरा वर्षे हा मुलांच्या वाढ व विकासाच्यादृष्टीने महत्वाचा काळ असतो. यादरम्यान पाठीच्या कण्यावर योग्य व आरोग्यवर्धक सवयींचा प्रभाव पडणे आवश्यक असते. या काळात सततचे ओझे वाहिल्याने मणक्यावर दाब तयार होऊन त्याचे दुखण्यात रुपांतर होणार नाही. याची पुरेशी दक्षता घेणे आवश्यक आहे. - डॉ. विनायक पाटील, एमबीबीएस बालरोगतज्ज्ञ

तालुक्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी 5 ते 7 किमी पायपीट करुन शाळा गाठतात. भर पावसात चिखलातून कसरत करत पाठीवर दहा ते बारा किलोचे ओझे वाहून न्यावे लागते. बर्‍याचवेळा विद्यार्थ्यांकडून अनावश्यक वह्या व पुस्तके वाहून नेली जातात. विद्यार्थ्यांचे हे हाल टाळण्यासाठी प्राथमिक शाळांनीही विषयवार वेळापत्रक अंमलात आणावे. - नारायण कापोलकर, अध्यक्ष मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान