Wed, Sep 26, 2018 11:00होमपेज › Belgaon › शर्यतींची धूम, मुक्या जनावरांचे हाल

शर्यतींची धूम, मुक्या जनावरांचे हाल

Published On: Mar 15 2018 1:17AM | Last Updated: Mar 14 2018 8:34PMकारदगा : प्रशांत कांबळे

बैलगाडी शर्यतींवर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध घालूनसुध्दा काही भागात बैलगाडी शर्यतीची धूम सुरुच आहे. जीवाच्या आकांताने बेभान धावणार्‍या मुक्या जनावरांच्या भावनांचा विचार येथे होताना दिसत नाही. केवळ स्वतःच्या मौजेसाठी जनावरांच्या जीवाशी शर्यतीचा खेळ खेळला जात आहे. त्यामुळे जनावरांना कोणतीच इजा आणि सजा होणार अशा पारदर्शक शर्यतींची गरज आहे.  

यात्रा, जत्रा, उरुस, विविध समारंभ आणि नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण व शहरी भागात बैल, घोडा, म्हैस  आदी प्राण्यांच्या शर्यतींचे आयोजन करण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने बैलगाडी शर्यतीतील बैलांचा अमानुष छळ होतो. शर्यत जिंकण्यासाठी जनावरांना करंट देणे, चाबूक, काठीने रक्तबंबाळ होईपर्यंत मारणे, छत्री, टोचा याने अंगाला टोचणे, दिवसभर उपाशी ठेवणे असा अमानुष छळ जनावरांचा होताना पाहिले आहे. काही वेळा तर पळता पळताच जु मोडणे, बैल ठेचकाळून पडल्याने मैदानावरच बैलांना जीव गमविण्याचा प्रसंग ओढवतो. काही शर्यतीचा थरार गाडी मालकांच्या जीवावरही बेतला जातो. पळणार्‍या बैल किंवा घोडागाडीच्या मागे शर्यती जिंकण्यासाठी मागून दुचाकी लावून गाडी नंबरात आणण्याचा खटाटोप गाडी मालकांचा असतो. अशावेळी रस्त्यावरील दुचाकींया गर्दीने अपघात घडत असतात. पण जनावरांच्या जीवाचा पर्वा न करता केवळ मैदान कसे जिंकता येईल, यावरच गाडी मालकांचे लक्ष केंद्रित असल्याने जनावरांचा मोठा छळवाद होतो. 

रक्तबंबाळ पाठ, काठीचे व्रण आणि हातभर जीभ काढून धावणारी जनावरे पाहिल्यास शर्यतींचा मुख्य उद्देश मौजमजा हाच असून आपण मात्र मुक्या प्राण्यांना ‘सजा’ देण्याचे महान कार्य करत आहोत. हे कुठेतरी थांबले पाहिजे.