Fri, Jul 19, 2019 13:51होमपेज › Belgaon › कट्टर हिंदुत्त्व विरुद्ध सर्वसमावेशकतेची लढाई

कट्टर हिंदुत्त्व विरुद्ध सर्वसमावेशकतेची लढाई

Published On: May 07 2018 2:01AM | Last Updated: May 06 2018 11:58PMबंगळूर : प्रतिनिधी

उडपी जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होणार आहे. गत निवडणुकीत याच दोन पक्षातील उमेदवार निवडून आले होते. किनारपट्टीवरील या जिल्ह्यात हिंदुत्त्वाचा मुद्दा उपस्थित करून मतदारांची मने वळविणे शक्य आहे, असे म्हणणे चुकीचे ठरेल. परिस्थितीनुसार येथील मतदार उमेदवारांना कौल देत आला आहे. आतापर्यंतच्या निकालांवरून तसे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

2008 मध्ये भाजप सरकार असताना प्रशासनाविरोधी लाट निर्माण झाली. त्यामुळे पाचपैकी तीन मतदारसंघांत काँग्रेस उमेदवारांना यश मिळाले. यंदा परिस्थिती वेगळी आहे. राज्य आणि केंद्र सरकारला विविध पातळीवर आलेले अपयश, विद्यमान आमदारांची कार्यपद्धती, व्यक्‍तीच्या प्रभावामुळे मतदारांमध्ये थोडासा गोंधळ आहे.उडपी मतदारसंघातील काँग्रेस आमदार प्रमोद मध्वराज, कापूचे आमदार विनयकुमार सोरके, बैंदूरचे आमदार के. गोपाल पुजारी आणि कार्कळचे भाजप आमदार व्ही. सुनीलकुमार यांनी विकासकामे केल्याचे मतदार सांगतात. पण, कुंदापूरचे आमदार हालाडी श्रीनिवास शेट्टी यांच्या बाबतीत काहीशी उदासीनता आहे.

भाजप आणि संघ परिवारातील सदस्यांच्या हत्या, टिपू सुलतान जयंतीचा वाद, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची कथित हिंदूविरोधी भूमिका हे प्रचाराचे मुद्दे आहेत. लिंगायत धर्माच्या मुद्द्यांवरही मतदारांत चर्चा सुरू आहे. दरम्यान, भाजपने 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी काही आश्‍वासने मतदारांना दिली होती. ती पूर्ण झालेली नाहीत. शिवाय हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेऊन काहीजणांनी विदेशात पलायन केले आहे.केंद्राचा पाठिंबा असल्याशिवाय असे घडत नसल्याचे मत काहीजण व्यक्‍त करतात. हालाडी श्रीनिवास  शेट्टी केवळ वैयक्‍तिक वर्चस्वावर आतापर्यंत चारवेळा निवडून आले आहेत. त्यांच्याविरूद्ध काँग्रेसने जोरदार तयारी केल्याने या निवडणुकीत त्यांचा विजय सोपा नाही. निवृत्त पोलिस अधिकारी तसेच भारतीय जनशक्‍ती काँग्रेसच्या मुख्य सचिव अनुपमा शेणॉय कापू मतदारसंघातून रिंगणात आहेत. शहर परिसरात त्यांची ओळख असली तरी ग्रामीण भागात त्यांच्याबद्दल फारसे काही माहीत नाही. 

कार्कळमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी भाजपचे व्ही. सुनीलकुमार आणि काँग्रेसचे एच. गोपाल भंडारी पुन्हा एकदा रिंगणात आहेत. उडपी मतदारसंघात काँग्रेसतर्फे मंत्री प्रमोद मध्वराज, भाजपचे के. रघुपती भट एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. ते शालेय मित्र असले तरी राजकीय आखड्यात एकमेकांचे विरोधक आहेत. बैंदूरमध्ये काँग्रेसचे के. गोपाल पुजारी आणि भाजपचे बी. सुकुमार शेट्टी यांच्या चुरस आहे. निजदचे उमेदवार चार मतदारसंघात रिंगणात आहेत.

2013 चा निकाल

मतदारसंघ    विजेता
बैंदूर             के. गोपाल पुजारी
कुंदापूर         श्रीनिवास शेट्टी (अपक्ष)
उडपी           प्रमोद मध्वराज (काँग्रेस)
कापू             विनयकुमार सोरके (काँग्रेस)
कार्कळ         व्ही. सुनीलकुमार (भाजप)