Wed, Jul 17, 2019 00:04होमपेज › Belgaon › रेल्वे उड्डाण पूल कामाला वनखात्याचा अडथळा

रेल्वे उड्डाण पूल कामाला वनखात्याचा अडथळा

Published On: Jan 20 2018 1:38AM | Last Updated: Jan 19 2018 9:13PMबेळगाव : प्रतिनिधी

खानापूर रोड येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी रस्त्याच्या दुतर्फा 20 वृक्ष असून त्याच्या तोडणीसाठी रेल्वे खात्याने वनखात्याकडे परवानगी मागितली आहे. परंतु अद्याप वनखात्याने वृक्षतोडीस परवानगी दिली नसल्यामुळे पुलाचे काम रेंगाळले असल्याचे रेल्वे खात्याच्या सूत्रांनी सांगितले. 

वनखात्याने तातडीने वृक्षतोडीस परवानगी दिली व पुलाचे झपाट्याने काम सुरू ठेवले तर जूनपूर्वी म्हणजे पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करून पूल बेळगावच्या जनतेसाठी खुले करण्यात येईल, अशी माहितीही सूत्राने दिली. 

पुलाची लांबी अर्धा किलोमीटर इतकी राहणार असून   रुंदी 58 फूट इतकी आहे. रेल्वे उड्डाण पुलाच्या ठिकाणी एकूण 42 गर्डर्स घालण्यात येणार आहेत. ते गर्डर्स बंगळूर येथे तयार करण्यात येत आहेत. सदर पूल विभाजकासह सज्ज करण्यात येणार असून त्यावर फुटपाथचीही सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे दुचाकी व वाहनचालकांसह पुलावरून चालत जाणार्‍या नागरिकांचीही चांगली सोय होणार आहे. 

या उड्डाण पुलाच्या कामकाजासाठी एकूण शंभर कामगार कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीसाठी अत्याधुनिक अशी यंत्रसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. यामध्ये तीन जेसीबी, तीन काँक्रिट मशिन्स, एक क्रेन, पाण्याचे पाच टँकर्स, तेथील दगड व माती हलविण्यासाठी तीन ट्रॅक्टर, पाच टिप्पर व लाईट गेल्यास दोन जनरेटर सज्ज ठेवण्यात आले आहेत. सध्या त्याठिकाणी रिटेनिंग भिंतीचे कामकाज पूर्ण करण्यात आले आहे. मिलिटरी महादेव मंदिराच्या बाजूने सिमेंट काँक्रिटचे 33 कॉलम उभारण्यात आले आहेत.  एकूण 42 गर्डर्स घालण्याचे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर त्यावर स्लॅब घालण्यात येणार आहे.  

यापूर्वी ब्रिटिशांनी रेल्वे ओव्हरब्रिजच्या गॅरंटीची हमी 100 वर्षे इतकी दिली होती. तरीही तो पूल सुस्थितीत व मजबूत होता. त्याप्रमाणे नवीन उड्डाण पूलही 100 वर्षाच्या गॅरंटीनेच बांधण्यात येत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. हा पूल पूर्ण होईपर्यंत मात्र बेळगावातील वाहन चालकांना व नागरिकांना ठिकठिकाणी वाहतूक ठप्प होण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
धारवाड रोडवरही उड्डाण पुलाचे कामही संथगतीने सुरू आहे.

त्याकडेही रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप  वाहनचालक करत आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करून देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. आता जानेवारी संपत आला तरी पुलाच्या कामाचे भिजत घोंगडेच आहे. आतापर्यंत या पुलाचे काम निम्मे झाले आहे. अतरीही अनेक बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. गर्डर्स घालण्याचे काम प्रगतिपथावर आहे. तांत्रिक बाबी आणि विविध परवाने मिळण्यात होत असलेला विलंब पुलाचे काम रेंगाळण्यास कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. दोन्ही पुलांचे काम रेंगाळत चालल्याने शहरातील वाहतूक कोंडीत भरच पडते आहे.