Tue, Apr 23, 2019 00:29होमपेज › Belgaon › मतदानयंत्रापेक्षा मतपत्रिकाच  सुरक्षित : सिद्धरामय्या

मतदानयंत्रापेक्षा मतपत्रिकाच  सुरक्षित : सिद्धरामय्या

Published On: Mar 05 2018 1:41AM | Last Updated: Mar 04 2018 11:28PMधारवाड : प्रतिनिधी

मतदानयंत्रे पूर्णपणे सुरक्षित नाहीत, मतदानंयत्रांमध्ये फेरफार करता येतो, अशा वदंता उठत असतानाच आता या वादात मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्यांनी उडी घेतली आहे. मतदानयंत्रांपेक्षा मतपत्रिकाच सुरक्षित असून, आगामी विधानसभा निवडणूक मतपत्रिकांद्वारे व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे एकीकडे परराज्यातून कर्नाटकात मतदानयंत्रे मागवली जात असताना, मुख्यमंत्रीच मतपत्रिकांना पसंती देत असल्यामळे ऐनवेळी मतपत्रिकांद्वारेच मतदान होणार का, हा प्रश्‍न आहे.

जनाशिर्वाद यात्रेनिमित्त हुबळी-धारवाडच्या दौर्‍यावर असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी शनिवारी रात्री पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अनेक देशांनी मतपत्रिकांपासून मतदानयंत्रे हा प्रवास केला. पण मतदानयंत्राद्वारे झालेले मतदान पूर्णपणे सुरक्षित नाही, असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी पुन्हा मतपत्रकांचाच आधार घेतला. प्रगत राष्ट्रे जर पुन्हा मतपत्रिकांकडे वळत असतील, तर आपणही तसा विचार का करू नये? मतपत्रिका हाच मतदानाचा अधिक सुरक्षित पर्याय आहे. त्यामुळे आम्ही त्यासाठी आग्रही आहोत.

कर्नाटकात गेल्याच आठवड्यात महाराष्ट्र, छत्तीगडमधून सुमारे 5 हजार मतदानयंत्रे दाखल झाली आहेत. त्या मतदानयंत्रांचे मतदारसंघनिहाय वाटपही सुरू आहे. बेळगाव जिल्ह्यासाठीही मतदानयंत्रे बेळगाव एपीएमसीत दाखल झाली असून, व्हीव्हीपीटी ही मतदान पोचपावती देणारी यंत्रेही पोचली आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

आरोप काय?

मतदानयंत्रे सुरक्षित नाहीत, त्यामध्ये फेरफार करून विशिष्ट पक्षालाच मते मिळतील, अशी व्यवस्था करता येत असल्याचा आरोप आहे. बिहार, दिल्ली, राजस्थान, पंजाब या राज्यांमधील निकालानंतर असे आरोप झाले होते. मात्र निवडणूक आयोगाने ते आरोप फेटाळून लावताना फेरफार सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. तसेच त्यासाठी इनामही जाहीर केले होते. ते आव्हान अजूनपर्यंत तरी स्वीकारले गेलेले नाही.