Mon, Apr 22, 2019 01:43होमपेज › Belgaon › गौरी हत्येतील संशयित कलबुर्गी यांचे मारेकरी?

गौरी हत्येतील संशयित कलबुर्गी यांचे मारेकरी?

Published On: Aug 02 2018 1:55AM | Last Updated: Aug 02 2018 1:32AMबंगळूर : प्रतिनिधी

पुरोगामी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील चौघा संशयितांचा डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येतही सहभाग असल्याचा  सुगावा विशेष तपास पथकाला (एसआयटी) लागला आहे. 

अमोल कोळे, अमित दिगवेकर, राजेश बंगेरा आणि गणेश मिस्कीन यांचा कलबुर्गी हत्येत सहभाग असल्याचे दिसून आले आहे. कलबुर्गी हत्येचा तपास सीआयडी करत आहे. हे प्रकरण आता एसआयटीकडे सोपविण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. मात्र, दोन्ही प्रकरणे वेगवेगळी असल्याने वेगवेगळा तपास हाती घेण्याचा सल्‍ला एसआयटीने दिला आहे. 
गौरी लंकेश यांच्या हत्या करण्यात आल्यानंतर त्याकरिता वापरलेले पिस्तूल दहा दिवस संशयित सिव्हिल इंजिनिअर एच. एल. सुरेश याने आपल्याकडे ठेवून घेतले होते.

परशुराम वाघमारेने 5 सप्टेंबर 2017 रोजी हत्या केल्यानंतर ती पिस्तूल काळे याच्या सूचनेनुसार सुरेशकडे सुपूर्द करण्यात आली. दहा दिवसांनी काळे याने सुरेशकडून सदर पिस्तूल घेतली.पण, ती आता कोणाकडे आहे याचा तपास केला जात आहे. गौरी यांची हत्या करण्याचा कट रचल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मनोहर येडवे आणि प्रवीण ऊर्फ सुजीतकुमार हे दोघेही बंगळुरात दाखल झाले होते. त्यांनी इंटरनेटवर गौरी यांच्या घराचा पत्ता शोधला होता. हत्येच्या 15 दिवस आधी दोघांनी त्यांच्या घराच्या परिसरात पाहणी केली होती. 

दरम्यान, एच. एल. सुरेशला 8 ऑगस्टपर्यंत एसआयटी कोठडी देण्यात आली आहे. हत्या झाल्यानंतर त्याने मोटारसायकल नेली होती. हेल्मेट व संशयितांचे कपडे जाळल्याचा संशय त्याच्यावर असून याबाबत अधिक चौकशी केली जाणार आहे.

नरेंद्र नायकही लक्ष्य

जून 2017 मध्ये वाघमारेसह तिघा संशयितांची बंगेरा याने भेट घेतली होती. गौरी हत्येसाठी वाघमारे आणि आणखी दोघा प्रशिक्षितांना साहित्यिक के. एस. भगवान व मंगळुरातील विचारवादी नरेंद्र नायक यांच्या हत्येसाठी नियोजित करण्यात आले होते, अशी माहिती एसआयटीच्या सूत्रांनी दिली.