होमपेज › Belgaon › बेळगाव जिल्हा अखंड, विभाजन की त्रिभाजन?

बेळगाव जिल्हा अखंड, विभाजन की त्रिभाजन?

Published On: Mar 15 2018 1:17AM | Last Updated: Mar 15 2018 1:17AMबेळगाव : संदीप तारिहाळकर

कर्नाटकात भौगोलिक विस्ताराच्या दृष्टीने सर्वाधिक मोठा असलेल्या बेळगाव जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीआधी विभाजन आणि त्रिभाजनावरून राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे. जिल्हा निर्मितीच्या मागणीवरून आंदोलन छेडले गेल्यामुळे 1995 पासूनची ही समस्या पुन्हा ऐरणीवर आली आहे. मात्र आता अडचण आहे ती जिल्ह्याचे दोन भाग करायचे की तीन? त्यातच खासदार सुरेश अंगडींनी जिल्ह्याचे विभाजन करण्यासच विरोध केला आहे. परिणामी राजकीय वर्चस्वाची लढाई लोकांच्या सोयीपेक्षा जास्त महत्त्वाची ठरेल का हा प्रश्न आहे. येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.

जिल्ह्याचे तीन भाग झाल्यास...

बेळगाव जिल्हा : बेळगाव, खानापूर, हुक्केरी, कित्तूर.
गोकाक जिल्हा  : गोकाक, बैलहोंगल, सौंदत्ती, कित्तूर.
चिकोडी जिल्हा : चिकोडी, अथणी, रायबाग, निपाणी.

चिकोडी जिल्हा निर्मिती झाला तर       

कागल औद्योगिक वसाहतीच्या धर्तीवर विकासाला चालना मिळेल.

चिकोडी नगरपालिकेला महापालिकेच्या दर्जासाठी अनुकूल परिस्थिती होईल.

आयएएस, आयपीएस दर्जाचे वरिष्ठ अधिकार्‍यांच्या प्रशासनामुळे  सामान्यांच्या कामात गती येईल

 वैद्यकीय महाविद्यालयासह शासकीय शैक्षणिक संस्था  स्थापन होण्यास मदत होईल.

जारकीहोळी बंधू एकाच व्यासपीठावर

गोकाक जिल्हा निर्मितीच्या मागणीवरून जारकीहोळी बंधू मात्र एकाच व्यासपीठावर आले आहेत. पालक मंत्री व राज्याचे सहकार मंत्री रमेश जारकीहोळी, माजी मंत्री आ. सतिश जारकीहोळी, आ. भालचंद्र जारकीहोळी यांच्यात अंतर्गत राजकीय वाद असला तरी जिल्हा निर्मितीच्या मागणीसाठी एकत्र आले आहेत.

गोकाक जिल्हा निर्मितीस यांचा होतोय विरोध

गोकाक जिल्हा निर्मितीस बैलहोंगल, सौंदत्ती, रामदुर्ग या तालुक्यातील नागरिकांचा विरोध होत आहे. सौंदत्ती तालुक्यातील नागरिक  40 कि. मी. अंतरावर असलेल्या धारवाड जिल्ह्यात समावेश करा, अशी मागणी करत आहेत तर रामदुर्गमधील काही नागरिक आपला तालुका बागलकोट जिल्ह्यात समावेश करावा, अशी मागणी होत आहे.

जिल्हा निर्मितीसाठी सरकार सकारात्मक

जिल्हा त्रिभाजनासाठी सिद्धरामय्या सरकार प्रयत्नशील आहेत. येथील जनतेच्या गैरसोयीबाबत आम्ही मठाधिशांसह काही लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली. याबाबत सरकार सकारात्मक आहे.
        — खा. प्रकाश हुक्केरी                         

विभाजन झाल्यास जनतेचे हित

जिल्ह्याच्या विभाजनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. प्रशासकीयदृष्ट्या या निर्णयात जनतेचे हित असून जनेतची गैरसोय दूर होणार आहे.
-अमित कोरे, अध्यक्ष, दूधगंगा सहकारी साखर कारखाना, चिकोडी.

विकासकामांना गती येईल
जिल्ह्यापासून काही तालुक्यातील गावे 150 ते 175 किमीवर आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांना सातत्याने त्या भागात लक्ष देता येत नाही. जिल्हा विभाजन झाल्यास नागरिकांचा जिल्हा कार्यालयांशी संपर्क येऊन कामांना गती येईल.
— वीरकुमार पाटील, माजी मंत्री

सांस्कृतिक वैभव तोडू नका

राज्यात बंगळूरनंतर बेळगाव शहर राजधानीसमान आहे. बेळगाव हे केवळ जिल्हावासियांचे शहर नसून शेजारील चंदगडकरांचेही शहर आहे. या ठिकाणी सर्व भाषिकांची वसती आहे. तत्कालिन मंत्री सतिश जारकीहोळी, रमेश कत्ती यांच्यासह मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडेही जिल्ह्याचे विभाजन करू नका, अशी विनंती केली आहे.
           — खा. सुरेश अंगडी