होमपेज › Belgaon › फरार चोरटा दुसर्‍याच दिवशी घरफोडी करताना जेरबंद

फरार चोरटा दुसर्‍याच दिवशी घरफोडी करताना जेरबंद

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 21 2018 12:22AMनिपाणी : प्रतिनिधी

पोलिसांच्या हातातून बेळगावमधून निसटलेल्या अट्टल आंतरराज्य चोरट्यास आडवीपेठ विटा (जि. सांगली) येथे माय-लेकरांनी जेरबंद  करीत स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केले. लखन कृष्णनाथ माने (वय 24, रा. वंदूर, ता. कागल, जि. कोल्हापूर) असे चोरट्याचे नाव आहे.गुरूवारी मध्यरात्री विट्यातील कोरे यांच्या घरी चोरी करताना तो सापडल्याने नागरिकांनी बेदम चोपत  त्याला विटा पोलिसांच्या स्वाधीन केले. लखन मानेला ताब्यात घेण्यासाठी निपाणी पोलिसांचे विशेष पथक विट्याला रवाना झाले आहे. कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यातील  अनेक गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या लखन माने याने मे 2015 मध्ये निपाणीसह उपनगरात धुमाकूळ घालून आठ ते दहा घरफोड्या  केल्या होत्या.तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक धीरज शिंदे यांनी त्याला जेरबंद केले होते. या खटल्यात गुरूवारी निपाणी न्यायालयात लखनला हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याची पुन्हा बेळगाव हिंडलगा जेलमध्ये रवानगी केली. 

हवालदार सुरेश होळेगार त्याला घेऊन गुरूवारी बसने हिंडलगा जेलसमोरील बसस्थानकावर दाखल झाले. लखनने लघुशंकेचा बहाणा करून पळ काढला. तशी फिर्याद बेळगाव ग्रामीण पोलिसांत रात्री दाखल झाली होती. बेळगाव व निपाणी पोलिसांनी बेळगाव, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात त्याचा शोध जारी ठेवला. दरम्यान, शुक्रवारी सकाळी लखन हा विट्यात घरफोडी करताना स्थानिक नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले.विटा पोलिसांनी निपाणी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. शुक्रवारी सकाळी सीपीआय किशोर भरणी यांच्या मागदर्शनाखाली शहरचे साहाय्यक फौजदार एम.जी.निलाखे, हवालदार राजू कोळी, उदय कांबळे  यांनी विट्याला जावून लखन याला ताब्यात घेतले.

नेहमीच्या सवईमुळे पुन्हा जाळ्यात

तीन जिल्ह्याच्या पोलिस रेकॉर्डवर असलेल्या लखनला पोलिसांनी पकडलेल्यावेळी संधी साधून तो निसटला आहे. पण पुन्हा सापडताना घरफोडी करतानाच पकडला गेला आहे. नेहमीच्या सवईमुळे घरफोडी करताना त्याला पकडण्यात आले आहे.

होळेगार दुसर्‍यांदा अडचणीत

पोलिस हवालदार होळेगार हे लखन मानेला बसने बेळगावला घेऊन गेले. लखनने पोलिसांच्या तावडीतून धूम ठोकली. त्यामुळे हवालदार होळेगार याची पळता भुई थोडी झाली. होळेगार यांना दुसर्‍यांदा हलगर्जीपणा नडला असून गतवर्षी चिकोडी सबजेलमध्ये गार्ड ड्युटीवर असताना  दोन आरोपींनी शौचालयामधून पळ काढला होता.त्यावेळी त्यांच्यासह अन्य एका पोलिस कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई झाली होती.