Thu, Apr 25, 2019 14:14होमपेज › Belgaon › निःपक्षपणे कर्तव्याचे पालन करा 

निःपक्षपणे कर्तव्याचे पालन करा 

Published On: Mar 16 2018 1:23AM | Last Updated: Mar 15 2018 8:39PMखानापूर : प्रतिनिधी

पोलिसांमुळे समाजात कायदा व सुव्यवस्था टिकून आहे. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यात पोलिसांची भूमिका महत्वाची आहे. समाजाचा खाकी वर्दीवर असलेला विश्‍वास सार्थ ठरविण्यासाठी निःपक्षपणे कर्तव्याचे पालन करा, असे आवाहन राज्याच्या पोलिस महासंचालक निलमणी राजू यांनी पोलिस दलातील सेवेसाठी सज्ज झालेल्या पोलिस प्रशिक्षणार्थींना केले.खानापुरातील पोलिस प्रशिक्षण केंद्राचा रौप्यमहोत्सव आणि 16 व्या तुकडीच्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

निलमणी म्हणाल्या, दिवस-रात्र कर्तव्याचे पालन करत असताना पोलिसांवरील कामाचा ताण वाढला आहे. तरीही जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी प्रसंगी जीवाची पर्वा न करता चोखपणे समाजरक्षकाची भूमिका पोलिस पार पाडतात. त्यामुळे समाजानेही पोलिसांकडे मित्रत्वाच्या भावनेने पाहावे. जनतेशी आपुलकीचे नाते ठेवून काम केल्यास ताण जाणवणार नाही. ज्या जिल्ह्यात सेवेसाठी जाल तेथे खात्याची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करा. निवडणुकीच्या काळात चोखपणे कर्तव्याचे पालन करा.

16 व्या तुकडीतून म्हैसूर शहर, चिक्कमंगळूर, कोलार, चामराजनगर, मंड्या, हासन, मंगळूर, शिवमोग्गा या जिल्ह्यातील 295 पोलिसांना कर्तव्यनिष्ठेची शपथ देण्यात आली. प्रारंभी वरिष्ठ अधिकार्‍यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी प्रशिक्षण विभागाचे महासंचालक पदमकुमार गर्ग, अति. महासंचालक केएसआर चरणरेड्डी, भास्कर राव, डी. सी. राजाप्पा, एसपी सुधीर रेड्डी, सीमा लाटकर आदी उपस्थित होते.

इनडोअर क्रीडाप्रकारात यश मिळविलेल्या पुनित एच. जी, किशोर एम. व्ही, हालेश अज्जप्पगौडर यांचा तर मैदानी खेळातील विजेते बसवराज एन, चरणकुमार, जयकुमार के. जी यांचा चषक देऊन सन्मान करण्यात आला. नेमबाजीमध्ये शरत के. एन, नागराज आणि योगानंद यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला. सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी म्हणून म्हैसूरच्या महेश याचा तर डीजी ट्रॉफीसाठी शिवमोग्याच्या अल्ताफ बी. वाय याचा महासंचालकांच्याहस्ते गौरव करण्यात आला.

रौप्यमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन श्रीमती निलमणी यांच्याहस्ते करण्यात आले. यानिमित्त सेवानिवृत्त प्राचार्य जी. आर. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य एम. कुमार यांनी स्वागत व अहवालवाचन केले. कृष्णवेणी गर्लहोसूर यांनी सूत्रसंचालन केले. सी. आर. निलगार यांनी आभार मानले.

बँड व कवायत पथकाला दोन लाखाचे बक्षीस

प्रशिक्षणार्थींनी बँडपथकाच्या साथीने एका तालात बहारदार पथसंचलन सादर केले. या कवायत प्रकारातील शिस्त आणि तालेवारपणा पाहून महासंचालक निलमणी यांनी केएसआरपीच्या बँड पथकाचे व पोलिस प्रशिक्षकांचे कौतूक करुन त्यांना खात्याकडून दोन लाख रु. चे पारितोषिक जाहीर केले.