Thu, Jul 18, 2019 14:25होमपेज › Belgaon › कर्नाटकचा नवा ‘राज्यध्वज’?

कर्नाटकचा नवा ‘राज्यध्वज’?

Published On: Jan 20 2018 1:38AM | Last Updated: Jan 20 2018 1:38AMबंगळूर : प्रतिनिधी

कर्नाटकासाठी लाल-पिवळा-पांढरा रंग असलेला नवा ध्वज ‘राज्यध्वज’ म्हणून निश्‍चित करण्यात आला आहे. तो केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवला जाईल. केंद्र सरकारने मान्यता दिल्यास जम्मू-काश्मीरनंतर स्वतंत्र ध्वज असलेले कर्नाटक हे दुसरे राज्य ठरेल. तथापि, ‘स्वतंत्र राज्यध्वज’ ही संकल्पना संघराज्याला मान्य नसल्यामुळे केंद्र सरकार मान्यता देण्याची शक्यता कमी आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वतंत्र कर्नाटक ध्वजासाठी कन्‍नड-संस्कृती खात्याचे सचिव चक्रवर्ती मोहन यांच्या नेतृत्वाखाली 9 जणांची समिती गेल्या जुलैमध्ये स्थापन केली होती. त्या समितीने लाल, पिवळा, पांढर्‍या रंगाच्या आडव्या पट्ट्या असलेला ध्वज निश्‍चित केला आहे. ही समिती आपला ध्वज अहवाल येत्या सोमवारी राज्य सरकारला सादर करेल. तो अहवाल कॅबिनेट बैठकीत मांडला जाईल. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर स्वतंत्र ध्वज प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाईल.

राज्यासाठी स्वतंत्र ध्वज अस्तित्वात येऊ शकतो, असे मत राज्याच्या कायदा विभागाने या आधीच व्यक्‍त केले आहे. त्यानंतर ध्वजसमितीची स्थापना झाली. कन्‍नड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष  एस. जी. सिद्धरामय्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्‍त करताना म्हणाले, ध्वजाचे प्रारूप आम्ही तयार केले आहे, केंद्राकडून मान्यता मिळेल, अशी आशा आहे. 

भाजपचा विरोध

भाजपने काँग्रेस सरकारच्या या कृतीविरुद्ध कडाडून टीका केली आहे. राज्यात कन्‍नड अभिमान  वाढविण्याच्या द‍ृष्टीने सिद्धरामय्या यांचा हा स्वतंत्र ध्वज निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. पण, त्यामुळे देशाच्या ऐक्याला बाधा पाहोचेल, असे भाजपचे म्हणणे आहे.

रंग काय सांगतात़?

वर पिवळा, मध्यभागी पांढरा आणि तळात लाल, अशी ध्वजाची रचना आहे. पिवळा रंग सौहार्दतेचेे प्रतीक, पांढरा शांततेचे तर लाल रंग कर्नाटकाची अस्मिता आणि मूल्यांचे प्रतीक आहे, असे ध्वजसमितीचे म्हणणे आहे.

इतिहास काय?

देशात फक्‍त जम्मू आणि काश्मीरला स्वतंत्र  राज्यध्वजाची मुभा आहे. स्वातंत्र्यानंतर काश्मीर भारतात विलीन करतानाच ही घटनात्मक तरतूद करण्यात आली होती. मात्र, देशातील इतर राज्यांचा स्वतःचा ध्वज नाही. राष्ट्रध्वज हाच सर्वोच्च मानाचा ध्वज असेल, असे राज्यघटना सांगते. मात्र, लाल-पिवळा हा कर्नाटकाचा स्वतंत्र ध्वज असावा, अशी मागणी अभिनेते राजकुमार यांनी आपल्या एका चित्रपटात हा ध्वज वापरल्यानंतर होऊ लागली. 20 वर्षांनंतर सरकारने त्यासाठी ध्वजसमिती नेमली. 

उच्च न्यायालयाच्या ताशेर्‍यानंतरही!

ऑक्टोबर 2010 मध्ये तत्कालीन सदानंदगौडा सरकारने लाल-पिवळ्या ध्वजाला राज्याचा ध्वज म्हणून मान्यता देऊन तो राष्ट्रध्वज तिरंग्याबरोबर सरकारी कार्यालयांवर फडकवण्याची सक्‍ती केली होती. मात्र, राष्ट्रध्वज असताना दुसरा ध्वज सरकारी कार्यालयांवर कसा काय फडकवला जाऊ शकतो, अशी विचारणा करणारी याचिका बंगळूर उच्च न्यायालयात दाखल झाली. त्यावर निर्णय देताना उच्च न्यायालयाने ‘स्वतंत्र ध्वज’ ही संकल्पनाच देशहिताला मारक असून देशाची शकले पाडण्याचा विचार करू नका, असे ताशेरे राज्य सरकारवर ओढले होते. त्यानंतर गौडा सरकारने ध्वज सक्‍तीचा आदेश मागे घेतला होता.