होमपेज › Belgaon › गोलघुमट ‘जागतिक वारसा’ ठरणार?

गोलघुमट ‘जागतिक वारसा’ ठरणार?

Published On: Jul 31 2018 1:30AM | Last Updated: Jul 30 2018 11:04PMविजापूर : प्रतिनिधी 

विजापुरातील गोलघुमटसह चार ऐतिहासिक वास्तूंना जागतिक वारसा दर्जा मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन जोमाने प्रयत्न चालविले आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी विजापूर विकसित करण्याचा प्रशासनाचा विचार आहे. 

विजापुरामध्ये सुमारे 90 ऐतिहासिक इमारती आहेत. यामध्ये गोलघुमट, जामिया मशिद, इब्राहिम रोजा, गगन महल आदिंचा समावेश आहे. या चार इमारतींना दर्जासाठी प्रयत्न चालविले आहेत. या ऐतिहासिक वास्तू देशात प्रसिद्ध आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक ही स्थळे पाहण्यासाठी भेट देत असतात. 

अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात अनंत कुमार पर्यटन मंत्री होते. त्यावेळी त्यांनी गोलघुमट, इब्राहिम रोजा, जमा मशिद आणि गगन महल यांचा समावेश जागतिक वारसा दर्जात होण्यासाठी पहिल्यांदा प्रयत्न केले होते. यानंतर 2008 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यावर बसनगौडा पाटील -यत्नाळ यांनीही यासाठी पुढाकार घेतला होता. त्यावेळचे जिल्हाधिकारी मोेहंमद मोसीन यांनी जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांचे चित्रीकरण करून कागदपत्रे जमविली होती. ही कागदपत्रे व व्हिडिओ भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला देण्यात आली होती. या स्थळांचे ऐतिहासिक महत्व अधोरेखीत करून त्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करावे, असे म्हटले होते. तथापि जिल्हा प्रशासन पुरातत्व खात्याच्या उत्तराच्या प्रतिक्षेत अद्यापही आहे. 

सध्याचे जिल्हा प्रभारी सचिव मोहंमद मोसीन  यांनी पुन्हा एकदा प्रयत्न चालविले आहेत. विजापूरकरांचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी निर्णायक प्रयत्न सुरू आहेत. या चार स्थळांचा जागतिक वारसा यादीत समावेश करावा यासाठी अखेरचे प्रयत्न केले जात आहे. एक -दोन वर्षी याला यश येईल, अशी आशा मोसीन यांनी व्यक्त केली आहे. 

यामागचे कारण....

या ऐतिहासिक स्थळांच्या देखभालीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. या परिसरात अतिक्रमण वाढले असून याचा वापर इतर उद्योगासाठी केला जात आहे. याबाबतची तक्रार करूनही प्रशासनाने काहीच हालचाली केलेल्या नाहीत. कदाचित यामुळेही जागतिक वारसा मिळण्यात अडचणी येत असाव्यात, असे काही स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.