Fri, May 24, 2019 20:31होमपेज › Belgaon › संविधान बदलू देणार नाही : राहुल गांधी

संविधान बदलू देणार नाही : राहुल गांधी

Published On: Mar 25 2018 1:35AM | Last Updated: Mar 25 2018 1:36AMचामराजनगर : प्रतिनिधी

भाजप सरकारला कोणत्याही परिस्थितीत भारतीय घटना (संविधान) बदलू देणार नाही, असा निर्धार अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्‍त केला आहे. तसेच भाजपने हिंमत असेल तर येडियुराप्पांच्या भ्रष्टाचारावर बोलावे, असे आव्हानही शनिवारी त्यांनी दिले.

भाजपने घटनेवर हल्ला करण्याचे सत्र चालूच ठेवले आहे. भाजपच्या द‍ृष्टीने घटनेवरील हल्ला म्हणजे एक नवीन फॅशन वाटत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय घटना अमलात आणण्यासाठी लढा दिला. परंतु, तीच घटना बदलण्याचे सत्र भाजपने सुरू केले आहे. घटना बदलण्यास काँग्रेस देणार नाही, असा इशाराही राहुल गांधी यांनी भाजपला दिला आहे.

भांडवलदारांना कर्जमाफी!

भाजप सर्वसामान्यांच्या पैशांची चोरी करून ते श्रीमंतांना वाटत आहे. भाजपने देशातील शेतकर्‍यांचे कर्ज माफ केले नाही. पण नरेंद्र मोदींनी भांडवलदारांचे आतापर्यंत अडीच लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे, अशी टीकाही राहुल यांनी केली.

राहुल म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकात येऊन भ्रष्टाचाराविरोधी बोलत आहेत त्यांनी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा व त्यांच्या चार माजी सहकार्‍यांविरुद्ध बोलावे. कारण भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ते कारागृहात जाऊन आलेले आहेत. विधानसभेच्या प्रचाराआधी काँग्रेसने जनाशिर्वाद मोहीम सुरू केली असून, चामराजनगरमध्ये ते मेळाव्यामध्ये बोलत होते.

मागील लोकसभेच्या निवडणुकीवेळी भाजपने देशातील काळ्या पैशांचे निर्मूलन करतो व दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करून देतो, अशी घोषणा केली होती. आता त्यांच्या त्या शब्दाला काडीचीही किंमत राहिले नसल्याचे स्पष्ट होते, अशी टीकाही राहुल यांनी केली.

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने सिद्धरामय्यांच्या नेतृत्वाखाली जनतेला दिलेली आश्‍वासने पूर्ण केलेली आहेत. त्यासाठीच ते येत्या विधानसभा निवडणुकीतही पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा विश्‍वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

 

Tags : Karnataka Assembly Election,  Rahul Gandhi, Constitution, congress,