Tue, Mar 26, 2019 23:56होमपेज › Belgaon › काँग्रेसचे लक्ष्य आता लोकसभा

काँग्रेसचे लक्ष्य आता लोकसभा

Published On: Jun 09 2018 1:33AM | Last Updated: Jun 09 2018 12:13AMचिकोडी : काशिनाथ सुळकुडे

चिकोडी-सदलगा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्‍ला. खा. प्रकाश हुक्केरी व आ. गणेश हुक्केरी यांनी मतदारसंघावर मजबूत पकड ठेवली आहे. एकदाचा अपवाद वगळता हुक्केरींकडून सहकार नेते अण्णासाहेब जोल्‍ले यांना तीनवेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसचा हा बालेकिल्‍ला भेदणे  भाजपला कठीण आहे. आता लोकसभेवर सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे गणेश हुक्केरी यांचा 10 हजार 556 मतांनी विजय झाला. आगामी निवडणुकीत भाजपचाच आमदार निवडून येईल, असा विश्‍वास कार्यकर्त्यांच्या भेटीतून व्यक्‍त करण्यात येत आहे. खा. प्रकाश हुक्केरी व आ. गणेश हुक्केरी यांनी मतदारसंघात कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांतून कार्यकर्त्यांसह नागरिकांच्या घराघरात ठसा उमटविला आहे. विकासकामांच्या जोरावर आ. गणेश हुक्केरींच्या विजयाचा विश्‍वास सुरुवातीपासून व्यक्‍त करण्यात आला. आणि तो सत्यात आला.

निवडणुकीत भाजपनेही टक्‍कर देत विजय मिळविण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य सभा चिकोडीत आयोजित करून कार्यकर्ते आणि नागरिकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. पण मोदींच्या लाटेत काँग्रेसचा बालेकिल्‍ला असलेल्या चिकोडी-सदलगा मतदारसंघात परिवर्तन घडविणे शक्य झाले नाही. काँग्रेसचा बालेकिल्‍ला अबाधित राहिला.

या मतदारसंघात यापूर्वी भाजपने केंद्रीय मंत्री रमेश जिगजिनगी, ज्येष्ठ नेते बी. आर. संगाप्पगोळ, विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांना उमेदवारी देऊन हुक्केरी पिता-पुत्रांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. पण यश लाभले नाही. यंदा कार्यकर्ते आणि नागरिकांशी अधिक संबंध असलेल्या आणि सहकार संस्थेच्या माध्यमातून गावागावात जाळे विणलेल्या, आर्थिकदृष्ट्या तोडीचा उमेदवार म्हणून भाजपने सहकारनेते अण्णासाहेब जोल्‍ले यांना उमेदवारी दिली. काँग्रेसचा पाडाव करण्याचा भाजपतर्फे हा मोठा प्रयत्न दिसून आला. परिवर्तन घडविण्यासाठी वातावरण निर्मितीही केली. पण यंदाही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. आता सर्वांच्या नजरा लोकसभा निवडणुकीकडे लागल्या आहेत.

जोल्‍लेंना तीन वेळा अपयशच

खा. प्रकाश हुक्केरी, आ. गणेश हुक्केरी व सहकारनेते अण्णासाहेब जोल्‍ले हे एकसंबा येथील रहिवासी आहेत. मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वी जुन्या सदलगा मतदारसंघात खा. हुक्केरींविरुध्द जोल्‍लेंनी दोन वेळा निवडणूक लढविली. पण जोल्‍लेंचा पराभव झाला. आता मतदारसंघ पुनर्रचनेनंतर चिकोडी-सदलगा मतदारसंघातून जोल्‍ले यांनी आ. गणेश हुक्केरींच्या विरोधात निवडणूक लढवून यश मिळविण्याचा प्रयत्न केला. पण तीनवेळा हुक्केरी पिता-पुत्राकडून जोल्‍लेंना अपयशच आले.