Thu, Aug 22, 2019 08:21होमपेज › Belgaon › मुख्यमंत्र्यांची सभा अन् विरोधकांना फटकारे

मुख्यमंत्र्यांची सभा अन् विरोधकांना फटकारे

Published On: Apr 30 2018 1:43AM | Last Updated: Apr 29 2018 8:31PMनिपाणी : मधुकर पाटील

काकासाहेब पाटील उमेदवार म्हणजे मी स्वत: उमेदवार आहे.त्यांना मत म्हणजे ते मला व काँग्रेसला मत. म्हणून तर राज्यातील प्रचाराचे शुभारंभ उदघाटन निपाणी या क्र. 1  च्या मतदारसंघातून केले आहे...

तुम्ही फक्त त्यांना निवडून द्या बाकी सर्व मी पाहतो...

अशी दमदार वक्तव्ये करीत  मुख्यमंत्र्यांनी विरोधी भाजपवर फटकारे चालवले. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे साहजिकच  कार्यकर्ते व पदाधिकारी रिचार्ज झाले आहेत.

काकासाहेब पाटील यांना पाचव्यांदा उमेदवारी देण्यात मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचे मोठे योगदान आहे. पाटील हे मुख्यमंत्र्याचे निकटवर्तीय मानले जातात. काकासाहेब पाटील यांनी 15 वर्षात आमदार असताना पाणीप्रश्‍न, तालुक्याची मागणी ही कामे केली. तीनवेळा निवडणुक जिंकुनही हा माणूस आहे तसा साधाच असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी  गेल्या पाच वर्षात राज्याचा झालेला सर्वांगीण विकास व काँग्रेस पक्षाने राबविलेल्या योजनांची माहिती जनसमुदायाला  दिली. खास करून निपाणी तालुका निमिर्तीसाठी काकासाहेब पाटील आणि खा. प्रकाश हुक्केरी यांनी केलेले प्रयत्न मोलाचे व हिताचे ठरल्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत. शिवाय गेल्या पाच वर्षात काँग्रेस सरकारने बोले तैसा चाले याची प्रचिती जनतेला दिली.यामध्ये उस उत्पादकांना 1800  कोटी दिले.तर 165 पैकी 158 आश्‍वासनांची पूर्तता आपल्या सरकारने केल्याचे नमूद केले.

त्याला पूरक म्हणून या सभेत खा.प्रकाश हुक्केरी यांनी गेल्या निवडणुकीत विरोधी आमदारांना 18 हजारांचे मताधिक्क्य मिळाले होते, तर आपण लोकसभेसाठी उभे राहिलो, त्यावेळी निपाणी मतदारसंघाने हा आकडा पार करून मला  2 हजारचे मताधिक्य दिले, असे सांगितले. तर माजी आ.सुभाष जोशी यांनी आपण ज्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतो तोच उमेदवार विजयी होतो असे सांगितले. एकूणच मुख्यमंत्री या नात्याने पक्षाच्या कार्याची ओळख व राबविलेल्या योजनांची माहिती  मुख्यमंत्र्यांनी सभेत सविस्तर केल्याने कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे.

गेल्या आठवडाभरात ज्येष्ठ नेते शरद पवार, महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या अशा तीन दिग्गज नेत्यांच्या सभा निपाणी परिसरात झाल्या. त्याआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची सभा झाली होती. त्यामुळे निपाणी-चिकोडी परिसर राजकीयदृष्ट्या ढवळून निघाला आहे. येत्या 1 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी चिकोडीत येणार आहेत. त्यांच्या सभेमुळे पुन्हा निपाणी-चिकोडी परिसर राज्याच्या आणि देशाच्या नकाशावर झळकेल.