Fri, Apr 26, 2019 16:02होमपेज › Belgaon › विरोधकांच्या एकीमुळे भाजपला फटका

विरोधकांच्या एकीमुळे भाजपला फटका

Published On: Jun 07 2018 2:04AM | Last Updated: Jun 07 2018 12:19AMबेळगाव : प्रतिनिधी

राज्यातील काँग्रेस-निजद युती सत्तेच्या हव्यासापोटी झाली असून ही जनतेला अमान्य आहे. विरोधक एकवटल्यानेच भाजपला लोकसभा पोटनिवडणुकीत फटका बसला असल्याची कबुली भाजपचे खा. सुरेश अंगडी यांनी दिली.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या चार वर्षाच्या पूर्तीच्या निमित्ताने आपला लेखाजोखा मांडण्यासाठी बुधवारी सर्किट हाऊस येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. अनिल बेनके, माजी भाजप जिल्हाध्यक्ष विश्‍वनाथ पाटील, राजेंद्र हरकुणी आदी उपस्थित होते.

खा. अंगडी म्हणाले, कर्नाटकात काँग्रेस आणि निजद यांनी एकमेकांविरुध्द निवडणूक लढवली. भाजपला चांगले यश मिळाले. मात्र सत्तेच्या हव्यासापोटी काँग्रेस व निजद यांनी अभद्र युती केली. ही जनतेची फसवणूक आहे. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत विरोधक एकत्र आल्यानेच भाजपला फटका बसला. त्यांच्या अपप्रचाराला जनता बळी पडली आहे. याला भाजपची ध्येय-धोरणे कारणीभूत नाहीत. नरेंद्र मोदी हे जगातील शक्‍तिशाली नेते आहेत. त्यांनी ‘एक देश एक कर’ प्रणाली लागू करून करपध्दतीत सुधारणा केली आहे. यामुळे करदात्यांची संख्या वाढली असून देशाच्या प्रगतीत भर पडली आहे. त्यांनी सुरू केलेल्या जीएसटी, एफडीआय, डिजीटल व्यवहार आदी योजनांमुळे आर्थिक विकास झाला आहे. 

राम मंदिर बांधण्याचे काय झाले, असे विचारता ते म्हणाले, राममंदिर बांधण्यास भाजप कटिबध्द आहे. ही बाब आमच्या अजेंड्यावर आहे. सध्या प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे.

गेल्या चार वर्षात आपण मिरज-लोंढा दुहेरी रेल्वे मार्ग करण्यासाठी 3100 कोटी रुपये केंद्राकडून आणण्यामध्ये यश मिळविले आहे. बेळगाव स्मार्ट सिटी करण्यासाठी चार कोटी मिळवून दिले. शहरामध्ये तीन ओव्हरब्रिज बांधण्यात आले आहेत. रिंगरोडसाठी प्रयत्न सुरू आहेत. हलगा-मच्छे बायपास रस्ता कामाचा प्रारंभ झाला आहे. उर्वरित वर्षभरात विकासकामांना गती देण्यात येईल. 
शहरामध्ये अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे. पोलिस प्रशासन, राजकारणी कारणीभूत आहेत. युवा पिढी व्यसनाधीन बनत आहे. याला पायबंद घालण्याची नितांत गरज आहे. ते काम सत्ताधार्‍यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.