Sun, May 19, 2019 22:57होमपेज › Belgaon › कृषी उत्पादन चाचणी आता बेळगावातच

कृषी उत्पादन चाचणी आता बेळगावातच

Published On: Jun 23 2018 1:20AM | Last Updated: Jun 22 2018 10:46PMबेळगाव : प्रतिनिधी

भाजीपाला, फुले, फळांसह विविध कृषी उत्पादनांचा दर्जा तपासण्यासाठी बेळगावात अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू होत आहे. याचा फायदा बेळगावसह उत्तर कर्नाटकातील शेतकर्‍यांना होणार आहे. पेस्टीसाईड रेसिड्यू अ‍ॅनालिसिस (कीटकनाशक अवशेष चाचणी) असे प्रयोगशाळेचे नाव असून या ठिकाणी होणार्‍या दर्जा तपासणीमुळे शेतकर्‍यांना शेतीमाल निर्यातीची संधी उपलब्ध होणार आहे.

बेळगावसह  उत्तर कर्नाटकातील शेतकरी शेती उत्पादनांबरोबरच बागायती उत्पादने घेत आहेत. येथून उत्पादने निर्यात करण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. मात्र, अनेक देशांनी शेतीमालाच्या दर्जाबाबतचे प्रमाणपत्र सक्‍तीचे केल्याने शेतकर्‍यांसमोर अडचण निर्माण झाली होती. त्यावर बागायत खात्याने तोडगा काढला असून जैविक केंद्रामध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू केली आहे. या ठिकाणी शेतीमालाची चाचणी घेण्यात येत आहे. सध्या प्रयोगिक तत्त्वावर चाचण्या घेण्यात येत आहेत. लवकरच प्रयोगशाळेचा कायमस्वरूपी कार्यारंभ होणार आहे.

अलिकडच्या काळात रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर वाढला आहे. पीक कापणीनंतर त्याबरोबर कीटकनाशकाचे अंश, धूळ, खताचा अंश त्यामध्ये असतो. उत्पादनामध्ये असणारे त्याचे प्रमाण शोधण्यासाठी प्रयोगशाळेचा आधार घ्यावा लागतो. ही प्रयोगशाळा आता बेळगावातच उपलब्ध असल्याने शेतकर्‍यांना शेतीमाल निर्यातीचा मार्ग सुकर झाला आहे. याआधी धारवाड, बंगळूर, मुंबई येथे शेतीमाल पाठवून तेथील प्रयोगशाळेत चाचणी घेतली जात होती. दुसर्‍या टप्प्यातील चाचणी बंगळूर आणि मुंबई येथे होते. काहीवेळा विदेशातच अंतिम चाचणी केली जाते. दुसर्‍या टप्प्यातील चाचणीत काही कमतरता दिसून आल्यास विदेशात पाठविलेला माल अडवला जातो. यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.

या सर्वांचा विचार करून बेळगावातच प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. सर्व समस्यांवर प्रयोगशाळेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विविध टप्प्यांतील चाचण्यांसाठी शेतकर्‍यांना वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत होते. आता नव्या प्रयोगशाळेमुळे शेतकर्‍यांचे फेर्‍या आणि खर्चही वाचणार आहे. 

विविध उद्योजकांनाही सोयीस्कर

विविध उत्पादने निर्यात करणार्‍या उद्योजकांनाही प्रयोगशाळेचा उपयोग होणार आहे. लोणचे, जॅम, जेलीसह विविध खाद्यपदार्थ बेळगावात तयार केले जातात. आंतरराष्ट्रीय पातळीवर या उत्पादनांना मागणी आहे. या उत्पादनांचा दर्जा प्रयोगशाळेत तपासता येत असल्याने बंगळूर किंवा मुंबईची फेरी वाचणार आहे.