Sat, Apr 20, 2019 23:54होमपेज › Belgaon › ६३० कोटींची २४ तास पाणी योजना रेंगाळली

६३० कोटींची २४ तास पाणी योजना रेंगाळली

Published On: Dec 18 2017 2:29AM | Last Updated: Dec 17 2017 9:05PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

संपूर्ण बेळगाव शहरासाठी 24 तास पाणी योजना जागतिक बँकेने एकूण 630 कोटींची मंजूर केली आहे. त्या योजनेला जागतिक बँक, कर्नाटक सरकार व बेळगाव मनपा सभागृहाने मंजुरी देवून दोन वर्षाहून अधिक कालावधी लोटला. परंतु या योजनेचे काम रेंगाळले असून ते केव्हा सुरू होणार, हे मनपालाही जाहीर करणे अशक्य बनले आहे.

बेळगाव शहरासाठी 24 तास पाणी पुरवठा योजनेची निविदा यापूर्वी जागतिक पातळीवर कर्नाटक राज्य मुलभूत सुविधा विकास व अर्थ महामंडळाने काढली होती. त्यामध्ये मलेशियाच्या कंपनीसह तीन कंपन्यांनी भाग घेतला होता. त्यामध्ये मलेशियन कंपनीची निविदा उर्वरित दोन कंपन्यांपेक्षा अंंदाजीत खर्चापेक्षा सुमारे 100 कोटींनी कमी होती. त्यामुळे कर्नाटक राज्य मूलभूत विकास व अर्थ महामंडळाने ती निविदा मंजूर करून त्या कंपनीला 24 तास पाणी योजनेचे काम सुरू करण्यासाठी वर्क्स ऑर्डर दिली होती. परंतु सदर कंपनीने त्यामधून ऐनवेळी माघार घेतली व ते काम आम्ही करू शकत नाही, असे कळविले. त्यामुळे पुन्हा नव्याने जागतिक पातळीवर निविदा काढणे कर्नाटक सरकारला भाग पडले आहे. 

बेळगाव शहराची ही महत्वाकांक्षी 24 तास पाणी योजना या तांत्रिक बाबींमुळे ठराविक मुदतीत पूर्ण होणार नाही हे स्पष्ट दिसून येत आहे. जागतिक बँकेने बेळगाव दक्षिण भागातील पाच व बेळगाव उत्तर भागातील पाच वॉर्डामध्ये प्रायोगिक तत्वावर 24 तास पाणी योजना गेल्या काही वर्षापासून सुरू केली आहे. ती योजना यशस्वी ठरल्याने जागतिक बँकेने बेळगाव शहरासाठी 24 तास पाणी योजना राबविण्याचा निर्णय घेतला.

त्यासाठी शहरातील तज्ज्ञांची व सर्वसामान्य नागरिकांची मते जाणून घेण्यात आली. जागतिक बँकेच्या तज्ज्ञ कमिटीने अखेर ही योजना मंंजूर केली व त्या योजनेला मनपा सभागृहानेही अखेर मंजुरी दिली आहे. या योजनेची निविदा स्वीकारलेल्या मलेशियन कंपनीने ऐनवेळी माघार घेतल्याने पुन्हा निविदा काढणे भाग पडले आहे. बेळगाव शहराला सध्या तीन दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. या योजनेचे कामकाज रेंगाळलेले पाहिले तर शहराला 24 तास  पाणीपुरवठा सुरू होण्यास अद्याप पाच वर्षाचा कालावधी  लागेल असे दिसून येत आहे.