Sat, May 25, 2019 22:34होमपेज › Belgaon › हेच का तुमचे राजकारण; जावडेकरांकडून भाजप नेत्यांची कानउघाडणी

हेच का तुमचे राजकारण; जावडेकरांकडून भाजप नेत्यांची कानउघाडणी

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 22 2018 1:16AMबंगळूर : प्रतिनिधी

‘एक आमदार तुम्ही फोडू शकला नाही. एकाही आमदाराने भाजपमध्ये येतो असे स्पष्टपणे तुम्हाला सांगितले नाही. बघतो, विचार करतो, असेच सगळे बोलत होते. हेच का तुमचे चार दशकांचे राजकारण’ अशा शब्दांत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी भाजपच्या चार ज्येष्ठ नेत्यांची कानउघाडणी केली आहे.

भाजपला बहुमत मिळवण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी मदत केली नाही, त्यामागे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांना असलेला विरोध हेही कारण मानले जाते. त्यामुळेच जावडेकरांनी बैठक घेऊन माजी उपमुख्यमंत्री आर. अशोक,  अनंतकुमार, माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा आणि माजी मंत्री सी. टी. रवी यांची कानउघाडणी केली. इतके दिवस राजकारण करूनही तुमचा संपर्क इतकाच कसा, असा प्रश्न त्यांनी या चार नेत्यांना केला.चौघेही नेते नव्या मंत्रिमंडळात स्वतःला प्रभावशाली मंत्रिपद कसे मिळेल, यासाठीच प्रयत्न करत असल्याची माहिती भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांपर्यत पोहचली. त्यातच एकाही विरोधी आमदाराने भाजपच्या गोटात सहभागी होण्याची तयारीसुद्ध दर्शवली नव्हती. त्यामुळे वरिष्ठ नेते संतप्त झाले होते. 

भाजपने आनंदसिंग तसेच प्रतापगौडा यांच्यासाठी गळ टाकला होता. पण तोही प्रयत्न फसला. काही आमदारांना विधानसभेत उपस्थित राहण्यापासून रोखण्याचाही प्रयत्न फसला. बी. सी. पाटील यांच्यासारख्या काही आमदारांना 25 कोटी आणि मंत्रिपद देण्याचे आमिषही कामी आले नाही. त्यामुळे व्यथित भाजप नेत्यांनी कारणांची शोधाशोध सुरू केली असता या चौघांची नावे पुढे आली.

ऑपरेशन कमळचा अनुभव

आमदार फोडू न शकण्यामागे 2008च्या ऑपरेशन कमळचा अनुभव कटू असल्याचे कारण भाजप नेत्यांनी वरिष्ठांना दिले आहे. 2008मध्ये ऑपरेशन कमळद्वारे भाजपमध्ये दाखल झालेल्या काही आमदारांच्या राजकीय कारकिर्दीची नंतर वाताहत झाली. निजदमधून भाजपमध्ये गेलेले भालचंद्र जारकोहीळी यांचा अपवाद सोडला तर पुढच्या निवडणुकीत अनेकांना पराभव पत्करावा लागला. हल्ल्याळचे तत्कालीन आमदार सुनील हेगडे हे त्याचे चपखल उदाहरण आहे. त्यामुळे यंदा दुसर्‍या पक्षातील आमदार भाजपमध्ये येण्यास किंवा बंडखोरी करण्यास उत्सुक नव्हते, असा अहवाल राज्यातील नेत्यांनी केंद्रीय भाजप नेत्यांना दिला आहे.