Mon, Jul 22, 2019 03:35होमपेज › Belgaon › पिरनवाडी येथे नामफलकावरून तणाव

पिरनवाडी येथे नामफलकावरून तणाव

Published On: Aug 27 2018 1:12AM | Last Updated: Aug 26 2018 11:34PMमच्छे : वार्ताहर

पिरनवाडी येथील शिवाजी चौकात नावाचा बोर्ड बसविताना दुसर्‍या समाजाच्या लोकांनी विरोध केल्याने गावात तणाव निर्माण झाला. घटनास्थळी वेळीच पोलिस दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणाखाली आली.

बेळगाव-जांबोटी महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या चौकाची जागा 1990 साली एका समाजाने खरेदी करून या ठिकाणी परवानगी घेऊन छ. शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला आहे. गेली कित्येक वर्षे या ठिकाणी विविध जाती-धर्माचे नागरिक गुण्यागोविंदाने राहत आहेत. पण, गेल्या दोन महिन्यांपासून काही बाहेरील राजकीय मंडळी दुसर्‍या समाजाला पुढे करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.  रविवारी (दि. 26) सकाळी 9 वा. शिवाजी चौकामध्ये खाली पडलेलाजुना बोर्ड बसविण्याचे काम काही नागरिक करीत असताना दुसर्‍या समाजातील काही तरुणांनी याठिकाणी येऊन धुडगूस घालून बोर्ड उभारण्यास विरोध केला.

यावेळी दोन्ही गटात बाचाबाची झाली. पाहता पाहता शेकडो लोक शिवाजी चौकात जमा झाले. तणाव वाढत चालल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. यावेळी सहाय्यक फौजदार गडाद, अशोक दोडमनी यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र तणाव अधिक वाढत गेल्याने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना बोलाविण्यात आले. सीपीआय नारायण स्वामी यांनी पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.  त्यांनी दोन्ही गटाच्या नागरिकांची समजूत काढून सामंजस्याने तोडगा काढण्याचे आवाहन केले.  तसेच दोन्ही गटानी महामार्गावर अतिक्रमण करून नामफलक बसवू नये, अन्यथा दोन्ही गटाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा दिला. त्यानंतर या वादावर पडदा पडला.