Thu, Jun 27, 2019 16:07होमपेज › Belgaon › ओढ दिल्यास दुष्काळ, पेरणी निष्फळ

ओढ दिल्यास दुष्काळ, पेरणी निष्फळ

Published On: Jun 18 2018 1:09AM | Last Updated: Jun 17 2018 11:47PMबेळगाव : प्रतिनिधी 

मृग नक्षत्राचा 8 जूनपासून प्रारंभ झाला असला तरी जिल्ह्यात यानंतर आठ? दहा दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही. एकीकडे अतिवृष्टी तर दुसरीकडे अनावृष्टी असा पावसाचा लपंडाव दिसून येत आहे.  ओढ दिल्यास दुष्काळाचे सावट आहे.

बेळगाव, खानापूर, हुक्केरी,  बैलहोंगल, सौंदत्ती तालुक्यांमध्ये गेल्या आठवड्यात पावसाने कहर केला. अतिवृष्टीने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानही झाले. पेरणीला पूरक पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी पेरणीही केली. 

मात्र गोकाक. रायबाग, चिकोडी, अथणी तालुक्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. या तालुक्यांत गेल्या वर्षी याचवेळेला पेरणीला पूरक पाऊस झाला होता. मात्र आता जून महिना संपत आला तरी पाऊस नाही. हीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिल्यास दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची भीती शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.

कृषी खात्याने यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये 6.79 लाख हेक्टरवर पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. 52 हजार हेक्टर जमिनीत तूर, 31.40 हेक्टरात मूग, 34.07 हेक्टरमध्ये भूईमूग, 36.25 हेक्टरमध्ये सूर्यफूल, 94 हजार  हेक्टरमध्ये मका, 50 हजार हेक्टरमध्ये बाजरी, 98.99 हजार हेक्टरमध्ये सोयाबिनसह उर्वरित जमिनीमध्ये इतर पिके घेण्याची तयारी शेतकर्‍यांनी केली आहे. जिल्ह्याच्या 35 विभागांमध्ये जूनच्या मध्यापर्यंत अपेक्षेइतका पाऊस झाला असून एकदल, द्विदल, तेलबिया व कापसाची 4.73 लाख हेक्टर जमिनीत पेरणी सुरू आहे. पाऊस झाला नाही तर पेरणीपैकी 28 टक्के निष्फळ ठरणार असल्याचा अंदाज कृषी खात्याने व्यक्त केला आहे.