Mon, Mar 25, 2019 02:50
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › मंदिरांची सुरक्षा रामभरोसे..!

मंदिरांची सुरक्षा रामभरोसे..!

Published On: Jul 17 2018 1:29AM | Last Updated: Jul 16 2018 10:05PMबेळगाव : प्रतिनिधी

मंगळवार दि. 10 रोजी मध्यरात्री बेकिनकेरे (ता. बेळगाव) येथील नागनाथ मंदिरावर चोरट्यांच्या टोळीकडून दरोडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांना केवळ दानपेटीतील 30 हजार रु. च्या ऐवजावरच समाधान मानावे लागले. मात्र अशाप्रकारे वारंवार चोरट्याकडून मंदिरे लक्ष्य होत आहेत. त्यामुळे बेळगाव तालुक्यासह जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

अनेक भाविकांच्या सढळ हस्ते मदतीतून गावोगावी लाखो रुपयांपासून कोट्यवधी रुपये खर्चून भव्य मंदिरे साकारण्यात येत आहेत. अशा मंदिरातून देवदेवतांना लाखो रुपयांची आभूषणे घातली जातात. 
या आभूषणावरच चोरट्यांचा डोळा आहे. बेळगाव तालुक्यासह जिल्ह्यात मंदिरांना लक्ष करणारी चोरट्यांची टोळीच सक्रीय असल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास येत आहे. पोलिसांनी या टोळीचा मागोवा घेऊन ठोस मोहीम राबविण्याची मागणी भाविकांमधून होत आहे. 

गेल्या वर्षभरात केवळ मंदिरांमधून झालेल्या चोरीच्या घटनांचा अभ्यासकरता कोट्यवधी रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.  बेळगाव शहरापासून ठरावीक अंतरावर असलेल्या किमान 15 ते 20 गावातील मंदिरात चोर्‍या झाल्या आहेत.घडलेल्या सर्व चोर्‍या एकाच चोरट्यांच्या टोळीकडून घडत असाव्यात, असा देवस्थान समितींना संशय आहे. त्यामळे त्यादृष्टीने पोलिसांनी तपास करावा, अशी  मागणी नागरिकांतून होत आहे.

एकाच दिवशी चार मंदिरांत चोरी

बेळगाव  व चंदगड तालुका एकमेका शेजारी असल्याने जी चोरट्यांची टोळी बेळगाव तालुक्यात सक्रिय आहे. त्याच टोळीच्या कारवाया चंदगड तालुक्यातही सातत्याने सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी शिनोळी येथे एका सोसायटीत चोरीचा प्रयत्न झाला  आहे. तर कोवाड (ता. चंदगड) परिसरातील कुदनूर, दुंडगे, कोवाड, निट्टूर या गावातील मंदिरात एकाच दिवशी चोरी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. त्यामुळे बेळगाव व चंदगड पोलिसांनी संयुक्त  तपास करण्याची गरज आहे.