होमपेज › Belgaon › शिक्षकांना ग्रामीण भागात सेवा सक्‍तीची

शिक्षकांना ग्रामीण भागात सेवा सक्‍तीची

Published On: Jun 30 2018 1:15AM | Last Updated: Jun 29 2018 8:28PMबेळगाव : प्रतिनिधी

शहर, शहरानजीकच्या शाळांतून दहा वर्षे  सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना   ग्रामीण भागात सेवा बजावावीच लागणार आहे, असा आदेश उच्च न्यायालयाने केला आहे. काही शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून बदलीवर स्थगिती आणली होती. त्या याचिकेवर गुरूवारी न्यायाधीशांनी निकाल दिला आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी कौन्सिलिंगवर स्थगिती आणली होती. न्यायालयाने ग्रामीण भागात शिक्षकांनी सेवा केलीच पाहिजे, असा आदेश दिला आहे. त्यामुळे बदलीचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षक बदलीच्या नियमावलीत काही बदल करावेत, अशी मागणी काही शिक्षकांनी केली होती. मात्र आदेश न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायमूर्ती एम. एच. जी. रमेश आणि न्यायमूर्ती महंमद नवाज यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. प्रत्येकाने ग्रामीण भागात सेवा केली पाहिजे. त्यामुळे बदली प्रकियेत कोणताच बदल होणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.  शिक्षण खात्याने अ, ब, क अशी श्रेणी तयार  केली आहे. त्यानुसार बेळगाव शहर, नगरपालिका, नगरपंचायत व तालुका केंद्रांचा अ वर्गात समावेश केला आहे. शहरापासून 20, 15 व 10 कि. मी. गावातील शाळांना ब श्रेणी दिली आहे.  ग्रामीण भागातील शाळांचा क  श्रेणीत समावेश करण्यात आला आहे.

शिक्षकांची बदली प्रक्रिया होणारच

राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक बदलीवर काही शिक्षकांनी उच्च न्यायालयात स्थगिती मिळविली होती. मात्र उच्च न्यायालयाने गुरूवारी स्थगिती उठविली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बदलीचा मार्ग मोकळा झाला आहे.  शिक्षण खात्याने बदली प्रक्रिया विधानसभा निवडणुकीमुळे एप्रिल व मे महिन्यात राबविली नाही. तसेच सरकारने बदलीच्या नियमावलीत काही बदल केले आहेत. त्यामुळे दोन वर्षापासून बदली प्रक्रिया रखडली आहे. शहरात दहा वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना ग्रामीण भागात पाठविण्यात येणार होते.  त्यावर काही शिक्षकांनी आक्षेप घेऊन न्यायालयात बदलीवर स्थगिती मिळविली. पण न्यायलयाने गुरूवारी  बदलीची स्थगिती उठवली आहे. शहरातील शिक्षकांना ग्रामीण भागात  नोकरी करावीच लागणार, असे स्पष्ट केले आहे. बदली प्रक्रिया होणार स्पष्ट झाले आहे. शिक्षकांची बदली प्रक्रिया 18 जूनपासून होणार होती. मात्र नवीन वेळापत्रक आल्यानंतर शिक्षकांचे कौन्सिलिंगद्वारे बदली होणार आहे.