Sun, Oct 20, 2019 12:19होमपेज › Belgaon › शिक्षक अन् विद्यार्थीही चारच

शिक्षक अन् विद्यार्थीही चारच

Published On: Jun 27 2018 1:19AM | Last Updated: Jun 26 2018 11:56PMनिपाणी : राजेश शेडगे

सन 1856 साली स्थापन झालेल्या येथील मराठी मुलांची शाळा क्र. एकचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शाळा अखेरची घटका मोजत असल्याचे चित्र आहे. सध्या पहिली ते सातवीपर्यंत मुख्याध्यापकासह चार शिक्षक आणि विद्यार्थीही फक्‍त चारच, अशी अवस्था  आहे. 

शहराच्या मध्यवर्ती भागात प्रभात टॉकीजसमोरची ही शाळा एकेकाळी शहराचे वैभव होती. 2008-2009 पर्यंत शाळेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. आज पहिलीच्या वर्गात एक विद्यार्थी असून दुसरी ते पाचवीपर्यंतच्या वर्गात विद्यार्थीच नाहीत. सहावीमध्ये 2 आणि सातवीमध्ये 2 अशी विद्यार्थ्यांची संख्या आहे. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून आर. आर. गायकवाड काम पाहत असून एक कन्नड व तीन मराठी शिक्षक कार्यरत आहेत. विद्यार्थीच नसल्याने शिक्षकांना अधिकतर वेळ बसूनच काढावा लागत आहे. 

यंदा सातवीचा एक विद्यार्थी बेडकिहाळ येथील शाळेत दाखल झाल्याने त्याच्या मुख्याध्यापकांनी शाळा क्र. 1 ला पत्र पाठवून दाखला देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे पाचपैकी एक विद्यार्थी कमी होऊन संख्या चारवर आली आहे.

निपाणकर सरकारांच्या काळात या शाळा इमारतीचे बांधकाम झाले. आजही ही इमारत सुस्थितीत आहे. शाळेत 12 खोल्या असून, ग्रंथालयात सुमारे दोन हजारांवर पुस्तके आहेत. विज्ञान, खेळाचे साहित्य, नकाशे, तक्ते असे असूनही पालकांनी पाल्यांना या शाळेत घातलेले नाही.  शिक्षकांनी एप्रिल-मे महिन्यात शहराच्या विविध भागात फिरून विद्यार्थीसंख्या वाढविण्याचा प्रयत्न केला. पण इंग्रजीचे फॅड आणि कन्‍नडसक्‍तीमुळे या शाळेत मुलांनी प्रवेश घेतलेला नाही.

चार वर्षापूर्वी शाळेत मराठी शाळा क्र. 4 आणि दोन वर्षापूर्वी शाळा क्र. 2 चे विलीनीकरण झाले आहे. आता मराठी मुलांची शाळा क्र. एक कमी विद्यार्थीसंख्येमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे निपाणी शहरातून हळुहळू सरकारी मराठी शाळांचे अस्तित्वच संपुष्टात येत आहे. गरीब घरातील मुलांना या शाळेत शिक्षणासाठी घालण्याची मानसिकता पालकांनी ठेवल्यास शाळा वाचणार आहे. अन्यथा प्रभात टॉकीज, दत्त खुले नाट्यगृहानंतर शाळा क्र. एक येथे होती, असे सांग्याची नामुष्की येणार आहे.