Fri, Jul 19, 2019 00:53होमपेज › Belgaon › शिक्षकदिन आमंत्रण पत्रिका फक्‍त कन्‍नडमधून !

शिक्षकदिन आमंत्रण पत्रिका फक्‍त कन्‍नडमधून !

Published On: Sep 05 2018 2:12AM | Last Updated: Sep 04 2018 11:05PMखानापूर : प्रतिनिधी

आज 5 सप्टेंबर रोजी साजर्‍या होणार्‍या तालुकास्तरीय शिक्षकदिन कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका केवळ कन्नड भाषेतून काढण्यात आली आहे. दरवर्षी कन्नड व मराठी दोन्ही भाषेतून पत्रिका छापली जाते. यावर्षी अनेक वर्षापासूनच्या भाषक समरसतेच्या परंपरेला खुद्द शिक्षण खात्यानेच हरताळ फासल्याने मराठी भाषक लोकप्रतिनिधी व जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात 
आहे.

खानापूर तालुक्यात मराठी माध्यमाच्या शाळा व शिक्षकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. साहजिकच शिक्षण खात्याकडून राबविण्यात येणार्‍या सर्व कार्यक्रमांच्या आमंत्रण पत्रिका राज्यभाषा कन्नड आणि स्थानिक जनतेची भाषा मराठी अशा दोन्ही भाषेतून छापण्याची अलिखित प्रथा रूढ आहे. यावर्षी मात्र याला छेद देण्याचे काम शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनी केले आहे.

तालुकास्तरीय शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात दोन्ही भाषक शिक्षकांचा हिरीरीने सहभाग असतो. या कार्यक्रमाचे नियोजन, आमंत्रण पत्रिका, प्रमुख वक्ते या सर्व ठिकाणी कन्नड-मराठीचा योग्य मेळ साधला जातो. दोन्ही भाषक शिक्षकांकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी करून घेतली जाते. तालुकास्तरीय शिक्षक दिनाचे खानापुरात आयोजन होत असल्याने परिसरातील सर्व शाळांचे मराठी भाषक शिक्षक सर्वाधिक संख्येने कार्यक्रमाला दिवसभर हजेरी लावतात.

शिक्षणाधिकारी कार्यालयातील अन्य अधिकार्‍यांना याबाबत पुरेशी माहिती असतानाही यावर्षीच्या आमंत्रण पत्रिकेवरून मराठीला हटविण्याच्या प्रकारामागे काही जणांनी जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. 

उत्कृष्ट शैक्षणिक सेवेबद्दल देण्यात येणार्‍या आदर्श शिक्षक पुरस्कारांची निवड करताना मराठी-कन्नड दोन्ही माध्यमाचा सुरेख समन्वय साधत आदर्श शिक्षक व आदर्श शाळा पुरस्कारांची निवड केली जाते. यावर्षीही हेच तत्त्व अवलंबून तीन मराठी, दोन कन्नड आणि एका ऊर्दू शाळेची आदर्श पुरस्कारासाठी निवड करण्याचे निश्‍चिचत करण्यात आले आहे. याशिवाय तिन्ही माध्यमाच्या 11 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. असे असताना आमंत्रण पत्रिकेतून मराठीला वगळून शिक्षणात अधिकार्‍यांना काय साध्य करायचे आहे, असा सवाल मराठी भाषकांतून विचारला जात आहे. तालुक्याच्या सत्तेवरुन म. ए. समिती खालसा व्हायला आणि नेमके याचवेळी मराठीला वगळण्याच्या प्रकाराला सुरुवात व्हायला, हे नेमके कशाचे द्योतक आहे, असाही प्रश्‍न शिक्षणप्रेमींतून उपस्थित केला जात आहे. याबाबत गटशिक्षणाधिकारी उमा बरगेर यांच्याशी संपर्क साधला असता, शासनाच्या आदेशानुसार कन्नड भाषेतून आमंत्रण पत्रिका काढल्या असून यामागे कोणताही अन्य हेतू नसल्याचे सांगितले.

दोन दिवसांपासून ता. पं सदस्य, जि. पं. सदस्य व अन्य लोकप्रतिनिधींना केवळ कन्नड भाषेतून छापण्यात आलेल्या आमंत्रण पत्रिकांचे वाटप सुरु आहे. निवडणुकीत मराठी अस्मितेचा डांगोरा पिटणारे लोकप्रतिनिधी अधिकार्‍यांच्या या कृत्याबद्दल जाब विचारणारका, याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

लोकप्रतिनिधी करताहेत काय ?

शिक्षण खात्याने मराठीला डावलून केवळ कन्नडमधून आमंत्रण पत्रिका काढून तिचे वितरणही सुरु केले आहे. याबाबत मराठी भाषक लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प आहेत. सीमाभागातून मराठी हद्दपार करण्याचे षड्यंत्र सुरु असताना त्यांची मौनीबाबा भूमिका भविष्यात महागात पडणारी आहे. सध्या ता. पं. वर मराठी भाषकांची सत्ता आहे. चार जि. पं. सदस्य मराठी आहेत. असे असताना त्यांनीही या प्रकाराकडे दुर्लक्ष चालविल्यानेच मराठीला डावलण्याचे धाडस अधिकार्‍यांकडून घडल्याचे बोलले जात आहे.