Fri, May 24, 2019 21:41होमपेज › Belgaon › शिक्षक भरती परीक्षा : पदे जास्त, पात्र उमेदवारांची संख्या कमी!

शिक्षक भरती परीक्षा : पदे जास्त, पात्र उमेदवारांची संख्या कमी!

Published On: Jun 24 2018 1:32AM | Last Updated: Jun 23 2018 11:52PMबेळगाव : प्रतिनिधी

सरकारी नोकरी मिळत नाही, युवक बेरोजगार आहेत, असे चित्र एकीकडे आहे. पण आपल्याकडे गुणवत्ता आहे का, हाही प्रश्न आता उभा ठाकला आहे. कारण 276 जागा भरावयाच्या असताना, शिक्षक भरती परीक्षेत केवळ 147 जण उत्तीर्ण झाले आहेत.

बेळगावात गेल्या डिसेंबरमध्ये भरती परीक्षा झाली.  1627 अर्ज भरले गेले. 1356 जणांनी परीक्षा दिली. 276 जागा रिक्त असून, 1356 जणांपैकी 276 जणही या परीक्षेत उत्तीर्ण झालेले नाहीत.

इंग्रजी विषयासाठी 123 जागा रिक्‍त असून केवळ 67 जण परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. तर विज्ञान विषयासाठी 89 जागांसाठी केवळ 13 जणच उत्तीर्ण होऊ शकले आहेत. अपवाद समाज विज्ञान विषयाचा. 34 जागा असून 62 जणांनी परीक्षा उत्तीर्ण केली. परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता 50 टक्के गुणांची गुणमर्यादा ठेवण्यात आली होती. त्यामुळे अनेक जण नापास झाले.

50 बहुपर्यायी व 100 विवरणात्मक प्रश्‍न असणार्‍या या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी 50 टक्के गुणांची अट ठेवण्यात आली होती. परंतु इंग्रजी, विज्ञान व इतर काही विषयामध्ये एकूण जागांपेक्षा कमी उमेदवार उत्तीर्ण झाल्याने एकूण 85 जणांची थेट निवड होणार असून त्यांच्यासाठी मुलाखत शिथिल करण्यात आली आहे.

राज्यातही तेच चित्र

पूर्ण कर्नाटक राज्यातही शिक्षकांच्या जागा अधिक आणि पात्र उमेदवार कमी अशी स्थिती आहे. यंदा एकूण 4 हजार जागा भरल्या जाणार आहेत. पण केवळ 2264 उमेदवार भरती परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. 

एकूण 35 शैक्षणिक जिल्ह्यात रिक्‍त असणार्‍या शिक्षकांच्या जागांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी 50,633 परीक्षार्थी हजर होते. त्यापैकी नेमणुकीसाठी पात्र ठरलेल्यांची संख्या 2,264 इतकी आहे. 1:2 या प्रमाणात बोलावण्यात येणार असल्याने 1,132 जणांना अंतिम यादीत निवडण्यात येणार आहे. त्यामुळे 75 टक्के जागा रिक्‍तच राहणार असून पुन्हा एकदा भरतीसाठी सीईटी घ्यावी लागणार आहे.

सरकारी शाळांमधील सहावी ते आठवीतील शिक्षकांच्या रिक्‍त पदांसाठी जिल्हानिहाय यादी जाहीर झाली आहे. 23 ते 30 जूनपर्यंत प्रमाणपत्र पडताळणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र, परीक्षेला उपस्थित राहिलेल्या सर्वांनाच एसएमएस पाठवून पडताळणीसाठी हजर राहण्याची सूचना केल्याने उमेदवारांत संभ्रम निर्माण झाला. शिवाय सीईटी आणि पदवी गुणातील गोंधळामुळे पडताळणी लांबणीवर टाकण्यात आली आहे.

सीईटी घेतल्यानंतर काही दिवसांनी बहुपर्यायी प्रश्‍नांचे की अ‍ॅन्सर जाहीर करण्यात आले. मात्र, थिअरीचे की अ‍ॅन्सर जाहीर झाले नाही. परीक्षर्थीला किती गुण मिळाले, याची माहितीही जाहीर करण्यात आली नाही. गुणांची कट ऑफ यादीही प्रसिद्ध न केल्याने शिक्षण खात्याविरूद्ध परीक्षार्थींनी नाराजी व्यक्‍त केली आहे.