Mon, Jul 22, 2019 03:22होमपेज › Belgaon › संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी सभागृह दणाणले

संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी सभागृह दणाणले

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 16 2018 11:44PMबेळगाव : प्रतिनिधी

तालुका पंचायतीची सर्वसाधारण बैठक कोरमअभावी रद्द करण्यात आली. मात्र,  म. ए. समिती सदस्यांनी मराठी कागदपत्रांचा मुद्दा उपस्थित करुन संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडले. 

तालुका पंचायत सभागृह अस्तित्वात येऊन दोन वर्षांचा कालावधी लोटत आला तरी मराठी सदस्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तालुका पंचायत सभागृहात झालेल्या पहिल्या बैठकीपासून म. ए. समितीच्या तालुका पंचायत सदस्यांकडून न्यायालयाच्या आदेशानुसार बैठकीचे इतिवृत्त, बैठकीची नोटीस यासह आवश्यक कागदपत्रे मराठी देण्यात यावीत, अशी मागणी करण्यात येत आहे. आजपर्यंत झालेल्या प्रत्येक बैठकीत मराठी कागदपत्रांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. मात्र, अध्यक्षांकडून नेहमीच या मागणीला बगल देण्यात आली आहे. 

शुक्रवारच्या बैठकीतही ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर , अप्पासाहेब किर्तने, नारायण नलवडे, मनीषा पालेकर, रेणुका सुळगेकर, नीरा काकतकर, लक्ष्मी मेत्री आदींनी मराठी कागदपत्रांची मागणी करत बैठकीत आवाज उठविला. 

गेल्या दोन वर्षांपासून मराठी कागदपत्रांसाठी मागणी केली जात आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. अनेकवेळा आवाज उठवूनही का दाखल घेतली जात नाही. न्यायालयाने भाषिक अल्पसंख्याकांना  त्यांच्या मातृभाषेत कागदपत्र देण्याचा आदेश दिला आहे,  असे सांगत न्यायलयाच्या आदेशाची प्रत दाखविण्यात आली. मात्र, नेहमीच मराठीविरोधात भूमिका घेणार्‍या ता.पं. अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांनी पुढील बैठकीत यावर चर्चा करुन निर्णय घेऊ, असे सांगत बैठक तहकूब झाल्याची घोषणा केली. तरीही मराठी सदस्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडले. तालुका पंचायत बैठकीला उपस्थित असलेल्या मराठी ग्रा.पं. अध्यक्षांनीही या बैठकीत मराठी कागदपत्रांसाठी आवाज उठविला.